महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढी पाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीरसभा होत आहे. या सभेतून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी कायमच राज ठाकरेंविरोधात षडयंत्र केलं, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. ते मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते.
उद्धव ठाकरेंना उद्देशून संदीप देशपांडे म्हणाले, “हे जे लोक आहेत, त्यांना षडयंत्र करण्याची सवय आहे. २००० सालानंतर बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती म्हणून राज ठाकरेंनी तुम्हाला (उद्धव ठाकरे) महाबळेश्वरच्या अधिवेशनात कार्याध्यक्ष केलं. स्वत: राज ठाकरेंनी तो प्रस्ताव दिला होता. त्यानंतर तो प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला. पण तुम्ही काय केलं? तर राज ठाकरेंच्या विरोधात कायम षडयंत्र केलं. हे षडयंत्र करायची तुम्हाला गरज भासली. कारण तुमच्यामध्ये कर्तृत्व नव्हतं. त्यामुळे तुम्हाला सतत सहानुभूती घ्यावी लागते.
हेही वाचा- राज ठाकरेंची आवडती अभिनेत्री कोण? थेट नाव घेत म्हणाले, “आतापर्यंत एकच अभिनेत्री…”
“ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, त्यांना सहानुभूतीची गरज नाही. राज ठाकरे यांच्याकडे कर्तृत्व आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्यासारखी सहानुभूती घ्यायची गरज नाही. राज ठाकरे यांच्याबरोबर षडयंत्र करून अशी परिस्थिती निर्माण केली. ज्यामुळे राज ठाकरे स्वत: बाहेर पडले पाहिजे, अशा पद्धतीचे राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवण्याची वेळ आली पाहिजे,” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.