राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा शिवसेना मनसे युतीचे तर्कवितर्क लावले गेले. मात्र, तशी युती वास्तवात उतरू शकली नाही. याबाबत कुणी कुणाला टाळी द्यावची हे वक्तव्य चांगलंच गाजलं. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही भाष्य केलं होतं. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. ते गुरुवारी (६ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
संदीप देशपांडे म्हणाले, “२०१७ मध्ये मी आणि स्वतः संतोष दुरी आम्हाला मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं. आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे असं सांगण्यात आलं.”
“युतीबाबत स्वतः उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”
“त्यावेळी आमच्याशी बोलणी केली आणि आम्हाला हेही सांगण्यात आलं की, आम्ही भारतीय जनता पार्टीशी लग्न मोडतो आणि त्यानंतर आपण नवीन लग्न करू. मात्र, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं,” असा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केला.
“खंजीर खुपसण्याची उद्धव ठाकरेंची सवय जुनी”
“बाकी मला काही माहिती नाही, मात्र खंजीर खुपसण्याची यांची सवय जुनी आहे एवढं नक्की,” असं म्हणत संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
“इतरांच्या अनुभवावर मी बोलू शकत नाही, पण…”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर प्रकरणात केलेल्या आरोपावर संदीप देशपांडे यांनी बोलणं टाळलं. इतरांच्या अनुभवावर मी बोलू शकत नाही, पण मी स्वतःचा अनुभव सांगू शकतो असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.
संदीप देशपांडे म्हणाले, “आनंद दिघेंबाबत त्यावेळी काय झालं आणि काय नाही हे मला काहीही माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. जो अनुभव माणसाला स्वतःला येतो त्यावर बोलू शकतो, जो इतरांचा अनुभव आहे त्यावर मी बोलू शकत नाही.”