मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला इजा झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, या हल्ल्याबाबत संजय राऊतांना विचारण्यात आलं असता, “संदीप देशपांडे कोण आहेत? असा प्रश्न राऊत यांनी विचारला होता. दरम्यान, यावरून संदीप देशपांडे यांनी राऊतांवर खोचक टीका केली आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा – “एकाने मागून स्टंपने हल्ला केला, अन् दुसऱ्याने…”; संदीप देशापांडेंनी सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम
काय म्हणाले संदीप देशपांडे?
“संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. मी पत्र लिहून त्यांच्याप्रती काळजी व्यक्त केली होती. त्यांना सारखं वाटतं की त्यांची कोणीतरी सुपारी दिली, ते सतत हल्ल्यासंदर्भात बोलत असतात. याला-त्याला शिव्या घालत असतात. उद्या जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागला, तर ते न्यायाधीशांनासुद्धा शिव्या घातल्याशिवाय गप्प बसणार नाहीत”, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.
उद्धव ठाकरेंचा ‘डॉक्टर’ असा उल्लेख
“मला संजय राऊतांबद्दल सहानुभूती आहे. त्यांच्यावर उपचार झाले पाहिजे. उद्धव ठाकरे तर मोठे डॉक्टर आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर उपचार करायला हरकत नाही”, अशी खोचक टीकाही संदीप देशपांडे यांनी केली.
“चौकशीपूर्ण झाल्यानंतर सविस्तर भूमिका मांडेन”
दरम्यान, त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संशय कोणावर आहे, असं विचारलं असता, “मी मला असलेली माहिती पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत यावर बोलणं योग्य नाही. चौकशीपूर्ण झाल्यानंतर मी सविस्तर भूमिका मांडेन”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – ‘चोरमंडळ’ विधानावर संजय राऊतांचं पुन्हा स्पष्टीकरण; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले, “माझ्या विधानाबाबत…”
राऊत नेमकं काय म्हणाले होते?
संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी हल्ला झाल्यानंतर संजय राऊत यांना याबाबत विचारण्यात आलं होतं. यावेळी बोलताना, “संदीप देशपांडे कोण आहेत? कुठे असतात ते? म्हणजे हा हल्ला नेमका कुठे झाला? कोणत्याही नागरिकावर अशा प्रकारे हल्ले होणं चांगल्या कायदा-सुव्यवस्थेचं लक्षण नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे चाललंय असं म्हटल्यामुळे अशा हल्लेखोरांना बळ मिळतं”, असं संजय राऊत म्हणाले होते.