महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला इजा झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, याप्रकरणी त्यांनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.
हेही वाचा – ‘चोरमंडळ’ विधानावर संजय राऊतांचं पुन्हा स्पष्टीकरण; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले, “माझ्या विधानाबाबत…”
काय म्हणाले संदीप देशपांडे?
“शुक्रवारी सकाळी मी नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघालो होतो. सकाळी शिवाजी पार्कच्या गेट नंबर पाच पाचजवळ असताना माझ्यावर एका व्यक्तीने स्टंपने हल्ला केला. मी मागेवळून बघताच तो माझ्या डोक्यावर स्टंपने हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. मी लगेच माझ्या उजव्या हाताने स्टंप पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दुसऱ्या एका व्यक्तीने स्पंटने माझ्या पायावर हल्ला केला. त्यानंतर याठिकाणी उपस्थित लोक माझ्या दिशेने धावून आल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला”, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
“चौकशीपूर्ण झाल्यानंतर सविस्तर भूमिका मांडेन”
हा हल्ल्याचा संशय कोणावर आहे, असं विचारलं असता, “मी मला असलेली माहिती पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत यावर बोलणं योग्य नाही. चौकशीपूर्ण झाल्यानंतर मी सविस्तर यावर भूमिका मांडेन”, असेही ते म्हणाले. तसेच “हा संपूर्ण घटनाक्रम बघितला, तर कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आम्ही तक्रार केली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी एकाला अटक केली. त्याच्यानंतर ४८ तासांत माझ्यावर हल्ला झाला”, असा दावाही त्यांनी केला.
“सरकारने सुरक्षा पुरवली, पण…”
“या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मला फोन आला होता. त्यांनी माझी विचारपूस केली. तसेच माझ्या सुरक्षेसाठी दोन पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात केले. पण माझी सरकारला विनंती आहे, की आम्ही कोणाला भीक घालत नाही आणि कोणाला घाबरतही नाही. त्यामुळे ही सुरक्षा त्यांनी काढून घ्यावी, ही माझी नम्र विनंती आहे. सुरक्षा द्यायचीच असेल तर ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना द्यावी”, असेही ते म्हणाले.
“…म्हणून माझ्यावर हल्ला झाला असावा”
“कोरोनातील भ्रष्टाचारात कोणती विरप्पण गॅंग आहे, हे सर्वांना माहिती आहे. महावीर फर्निचर आणि ग्रेस फर्निचर या दोन फर्मचा टर्नओव्हर कोविडच्या आधीपर्यंत १० लाखांचा होता. मात्र, त्यानंतर तो करोडो रुपयांमध्ये गेला. यांना कोविड सेंटरमध्ये बेडशीट आणि गाद्या पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. हा घोटाळा मी दोन दिवसांत बाहेर काढणार होतो. याचा सुगावा त्यांना लागला असेल”, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.