शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटातील नेत्यांवर टीका करत आहे. संबंधित नेत्यांचा अनेकदा ‘गद्दार’ असा उल्लेख करत आहेत. आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटातील नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शिंद गट आणि भाजपामध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचा दावा केला आहे. भारतीय जनता पार्टीच शिंदे गटातील नेत्यांचे घोटाळा बाहेर काढत आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या या आरोपानंतर शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकांचं लक्ष वेगळ्या दिशेला भरकटवण्यासाठी आदित्य ठाकरेंकडून चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं जात आहे, असं संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- सत्यजीत तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?; स्वत:च दिलं उत्तर, म्हणाले…
आदित्य ठाकरेंच्या दाव्याबाबत विचारलं असता संदीपान भुमरे म्हणाले की, भाजपा त्यांना घोटाळ्याचे पुरावे देत असेल तर त्यांनी (ठाकरे गट) एखादा तरी घोटाळा उघड करावा. विनाकारण मित्रपक्ष-मित्रपक्ष म्हणत आरोप करायचे आणि लोकाचं लक्ष वेगळ्या दिशेला वळवायचं, असं करू नये. मला सांगायचंय की त्यांनी एखादा तरी घोटाळा उघड करावा. मित्रपक्षाने (भाजपा) असं केलं… तसं केलं… म्हणायचं, कुठेतरी चुकीची माहिती देऊन जनतेत गैरसमज पसरावायचं काम ते करतात, असंही संदीपान भुमरे म्हणाले.
हेही वाचा- नारायण राणेंनी अजित पवारांना इशारा थेट दिला आहे…
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आदित्य ठाकरे रविवारी वरळी येथील सभेत म्हणाले, “हे सरकार कोसळणार आहे. हे थोड्या दिवसाचं सरकार आहे. त्यांच्या-त्यांच्यात भांडणं लागली आहेत. उद्या अधिवेशन आहे. आम्ही आमदार म्हणून उद्या जेव्हा विधानभवनात जाऊ… तेव्हा त्यांचा नवीन मित्रपक्ष (भाजपा) बनला आहे. त्यांच्यातील काही लोक आपल्याकडे येतात आणि या गद्दारांचे घोटाळे आपल्या हातात देतात. त्यामुळे जे गद्दार आहेत, त्यांनीही समजून घ्यावं, हा फार थोड्या दिवसाचा खेळ आहे.”