मुंबई : भद्रकालीची निर्मिती असलेले प्राजक्त देशमुख लिखित ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक २२ डिसेंबर २०१७ रोजी मराठी रंगभूमीवर आले. गेल्या पाच वर्षांत या नाटकाला राज्यभरातील प्रेक्षकांकडून उदंड प्रेम मिळते आहे. या नाटकाचे आता अखेरचे काही प्रयोग होणार असल्याची घोषणाही भद्रकालीच्या वतीने करण्यात आली होती. त्याअनुषंगाने राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांसह देशभरात नाटकाचे निवडक प्रयोग करून कार्तिक एकादशीच्या मुहूर्तावर नाटकाचा शेवटचा प्रयोग रंगणार असल्याची माहिती निर्माते प्रसाद कांबळी यांनी दिली. ९ मार्च ते २३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ‘देवबाभळी दिंडी – धावा जनामनाचा’ नावाने या नाटकाचा दौरा देशभरात रंगणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : रांजनोळीमधील गिरणी कामगारांच्या १२४४ घरांच्या दुरुस्तीचा वाद रंगणार, एमएमआरडीएचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पत्र

‘संगीत देवबाभळी’ हे नाटक रंगभूमीवर येऊन  पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे निरोप घेण्यापूर्वी या नाटकाचे देशभरात प्रयोग करण्याच्या उद्देशाने भद्रकाली प्रॉडक्शनने ९ मार्च २०२३ रोजी ‘तुकाराम बीज’ दिनाचे औचित्य साधत ‘देवबाभळी दिंडी धावा जनामनाचा’ची घोषणा केली आहे. ९ मार्च रोजी भारताचा शून्य किमी मैलाचा दगड असलेल्या केंद्रस्थानातून म्हणजेच नागपूर येथून या दिंडीला सुरुवात होणार आहे. तुकाराम बीज ते आषाढी एकादशी आणि अखेरीस कार्तिक एकादशीच्या दिवशी या दिंडीचा शेवटचा प्रयोग रंगणार असल्याचे प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संगीत नाटकांची वैभवी परंपरा मराठी रंगभूमीला आहे, मात्र काळाच्या ओघात संगीत नाटक काहीसे मागे पडले होते. या पार्श्वभूमीवर केवळ दोनच व्यक्तिरेखा आणि कलाकारांच्या अभिनयाने रंगलेल्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद हा थक्क करायला लावणारा आहे. या नाटकाने  राज्य पुरस्कार ते साहित्य अकादमी असे  सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त केले आहेत. मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक पुरस्कार मिळालेले हे एकमेव व्यावसायिक नाटक ठरले आहे.

कशी असेल ‘ संगीत देवबाभळी दिंडी’  विदर्भ-मराठवाडा

९ मार्च ते १९ मार्च २०२३ या कालावधीत नागपूर, आनंदवन, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड, लातूर, बीड , औरंगाबाद, जळगाव, नाशिक या शहरांमध्ये संगीत देवबाभळीचा दौरा असेल. त्यानंतर  कोकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र या विभागात हा दौरा असेल. महाराष्ट्रात या दिंडीचा दौरा पूर्ण झाल्यानंतर मग देशभर त्याचा प्रवास सुरू होईल.

‘वस्त्रहरण’ पुन्हा रंगभूमीवर…

भद्रकाली प्रॉडक्शन्सची मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती ‘वस्त्रहरण’ येत्या १६ फेब्रुवारी रोजी ४४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. याचे औचित्य साधून भद्रकाली प्रॉडक्शन्स तारांकित कलाकारांच्या संचात पुन्हा एकदा या नाटकाचे रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर करणार आहे. लवकरच या नाटकाचा प्रयोग क्र. ५२५५ रसिक प्रेक्षकां समोर सादर होणार असल्याचेही कांबळी यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangeet devbabhli marathi natak last show on kartiki ekadashi mumbai print news zws