लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. २०२२-२३ वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांमध्ये २०२२ या वर्षासाठी शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांना, तर २०२३ साठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी अशोक सराफ यांना २०२२ या वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर २०२३ या वर्षाठीचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला जाहीर झाला आहे.

आणखी वाचा-मुंबई : खुल्या निविदेद्वारे अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास

हिंदूस्तानी शास्त्रीय संगीतातील अलौकिक स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांची कन्या प्रसिध्द शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांनी वडिलांकडून गायनाचे धडे घेतले. तसेच आईकडूनही गायकीचे तंत्र त्यांनी शिकून घेतले. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासात आणि स्वरसाधनेत रमलेल्या कलापिनी आज प्रतिभावंतांच्या पिढीची समर्थ प्रतिनिधी आणि प्रसिध्द शास्त्रीय गायिका म्हणून ओळखल्या जातात. ‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’च्या माध्यमातून शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठीही त्या कार्यरत आहेत.

गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या दिग्गज गुरूंकडून संगीताचे धडे घेतलेल्या देवकी पंडित नंबियार या शास्त्रीय गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत, शिवाय सुगम संगीतातही पार्श्वगायिका म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.

आणखी वाचा-भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

गेली पन्नास वर्षे चतुरस्र अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची करमणूक करणाऱ्या अशोक सराफ यांना नुकतेच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. आता संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने हा आनंद द्विगुणित झाला आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कारांसह असंख्य पुरस्कार त्यांना या कलाप्रवासात आधीच लाभले आहेत. आता राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कला कारकिर्दीला पुरस्कार रूपाने दाद मिळाली आहे.

‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या ऋतुजाने मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमातून रसिकांचे रंजन केले आहे. अपघातात दोन्ही हात गमावलेल्या जिद्दी तरुणीची भूमिका तिने ‘अनन्या’ या नाटकात केली होती. दोन्ही हात मागे बांधून दीड दोन तास रंगभूमीवर तिने साकारलेल्या अनन्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या भूमिकेसाठी तिला बारा पुरस्कार मिळाले शिवाय एका भूमिकेसाठी वर्षभरात सर्वाधिक पुरस्कार मिळवल्याचा विक्रमही तिच्या नावावर नोंदला गेला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangeet natak academy award announced to veteran actor ashok saraf for his performance in the field of theatre mumbai print news mrj