मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ आणि ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ हे दोन चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी समान आशयाच्या या दोन चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते. मराठा समाजाला एकत्र घेवून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. परंतु, एकाच दिवशी ‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ आणि ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे. नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित, ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटाचा टिझर बुधवार, २९ मे प्रदर्शित करून चित्रपटाची तारीख जाहीर केली. तर, शुक्रवार, ३१ मे रोजी शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित ‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपटही १४ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे घोषित करण्यात आले.

हेही वाचा : मुंबई: पश्चिम रेल्वेवरील रविवारचा ब्लाॅक रद्द

‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट पूर्वी २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता परंतु, लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख २१ जून करण्यात आली. पण, पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीची कामे सुरु होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे ‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले. तर, ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती. ‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाची तारीख सुरुवातील २६ एप्रिल होती. त्यांच्या या तारखेच्या अनुषंगाने आम्ही जून महिन्यात ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ प्रदर्शित करण्याचे ठरवले होते. पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख दोन वेळा बदलली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहिला जायचे ते.

हेही वाचा : महा मेगा ब्लाॅकचा धसका; घरातून कार्यालयीन काम करण्यास कर्मचाऱ्यांची पसंती

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती ‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे, श्रीकृष्ण शिंगणे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा : एसटीचा ७६ वा वर्धापन दिन प्रत्येक बसस्थानकावर साजरा होणार

त्याचबरोबर, या चित्रपटाची संकल्पना डॉ. मधुसूदन मगर यांची असून, नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित, ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे.तसेच, सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरकर, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.