मुंबई : महिला प्रवाशांचे आरोग्य, स्वच्छतेच्या दृष्टीने महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) आता मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो २ अ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकावरील स्थानकांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच काही मेट्रो स्थानकांवर सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्रे बसविण्यात आली आहेत.
मेट्रो प्रवास सुरक्षित करण्याच्यादृष्टीने एमएमएमओसीएल नवनवीन सुविधा उपलब्ध करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता महिला प्रवाशांचे आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन मेट्रो स्थानकांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्र उपलब्ध करून देण्यास एमएमएमओसीएलने सुरुवात केली आहे. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने बोरिवली, कांदिवली, आकुर्ली, गुंदवली आणि दहिसर मेट्रो स्थानकांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्रे बसविण्यात आली आहेत. आता गरजेनुसार या यंत्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच इतर स्थानकांमध्येही ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत.