आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलनं आज माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह किरण गोसावींवर अनेक गंभीर आरोप केलेत.  साईलने आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय. यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली. त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने केला. प्रभाकर साईलने तो के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक असल्याचं म्हटलंय.

दरम्यान, यासंदर्भात साईलने काही व्हिडीओ एबीपी माझाशी बोलताना दाखवले. त्या व्हिडीओत आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याचं फोनवरून कुणाशी तरी बोलणं करून देत असल्याचं दिसतंय. त्यानंतर सॅम नावाचा एक व्यक्ती एनसीबी कार्यालयात आला आणि त्याच्यात आणि गोसावीमध्ये दोन मिटिंग झाल्याचा दावा साईलने केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ ट्विट केलंय. ज्यामध्ये किरण गोसावी आर्यन खानच्या शेजारी बसल्याचं दिसून येतंय.

यावेळी आपण एनसीबी कार्यालयात बसून असताना तिथं आणखी काय-काय पाहिलं यासंदर्भात प्रभाकर साईलने माहिती दिली आहे. आपण एनसीबी कार्यालयात प्लास्टिकच्या भरण्या, स्मोकिंग पेपर, गुलाबी कलरची लेडीज पर्स आणि सॅनिटरी पॅड पाहिलं होतं, असं साईलने सांगितलंय. महत्वाचं म्हणजे या प्रकरणात अटक केलेल्या मुनमुन धमेचाने सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवल्याची माहिती एनसीबीने दिली होती. ते सॅनिटरी पॅड आपण एनसीबी कार्यालयात पाहिलं, असं साईल म्हणाला.

Story img Loader