मुंबई : लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजयी झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संजय दीना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.

निवडणूक याचिकेतील कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असलेल्या नियमांची पूर्तता करण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने नोंदवले. तसेच, पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी अपक्ष उमेदवार शहाजी थोरात यांची याचिका फेटाळून लावली. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर झाले. परंतु, थोरात यांनी वैधानिक ४५ दिवसांच्या कालावधीनंतर म्हणजेज ३ सप्टेंबर रोजी मतदारसंघातील अन्य १८ प्रतिस्पर्धी उमेदवारांना याचिकेत प्रतिवादी करण्याची मागणी केली. एखादा उमेदवार स्वतःच्या पराभवासंदर्भात न्यायालयात दाद मागतो, त्यावेळी संबंधित मतदारसंघातील अन्य उमेदवारांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. याप्रकरणी थोरात यांनी इतर उमेदवारांना प्रतिवादी केलेच नाही किंवा तसे करण्यासाठी योग्य अर्ज केला नाही. थोरात हे निवडणूक याचिकेसाठी अनिवार्य असलेल्या कायदेशीर नियमांचे पालन करण्यास अपयशी ठरले, त्यामुळे, त्यांची याचिका फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा – खासगी छायाचित्रे वायरल करण्याची धमकी देऊन प्रियकरानेच खंडणी उकळली

हेही वाचा – राष्ट्रपती पदकविजेत्या पोलिसाची अटक बेकायदा, तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा

दरम्यान, निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना वडिलांच्या नावासह आईचे नाव समाविष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, पाटील यांनी उमेदवारी अर्जात आपल्या आईच्या नावाचा उल्लेखच केला नाही. हे निवडणूक नियमावलींचे उल्लंघन असून पाटील यांची खासदारकी यामुळे अवैध ठरत असल्याचा दावा व्यवसायाने टॅक्सीचालक असलेल्या याचिकाकर्त्यांनी निवडणूक याचिकेद्वारे केला होता. पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा २९ हजार ८०० मतांच्या फरकाने पराभव केला होता. खासदार म्हणून पाटील यांची दुसरी वेळ असून २००९ मध्ये त्यांनी भाजपच्या किरीट सोमय्या यांचा पराभव केला होता.