मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अत्याधुनिक रायफल बाळगल्याप्रकरणी शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्त रविवारी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने भाजपच्या व्यासपीठावर झळकला. गेल्या २० वर्षांहून अधिक काळ संजय दत्तला विरोध केलेल्या भाजपने पक्षाच्या व्यासपीठावर त्याला निमंत्रित केल्याने आगामी महापालिका निवडणुकीसाठी काही वेगळी राजकीय गणिते आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
संजय दत्तचे वडील सुनील दत्त व बहीण प्रिया दत्त हे काँग्रेसचे खासदार होते. संजयला बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झाल्यानंतर गेली काही वर्षे भाजप नेते त्याच्या विरोधात होते. शिक्षा झाल्यावरही त्याची वारंवार पॅरोलवर मुक्तता केली जात असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांनी टीका केली होती. मात्र त्याच संजय दत्तला उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंभोज यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमास निमंत्रित केले होते. या निमित्ताने ‘उत्तर रत्न पुरस्कार’ व संगीत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
पक्षाकडून समर्थन
संजय दत्तने शिक्षा भोगली असल्याने आता तो सर्वसामान्य नागरिक झाल्याचे अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सांगितले. त्याने महाराष्ट्र दिन समारंभात सहभागी होण्याची तयारी दाखविल्यास त्याला आम्ही विरोध का करायचा, असा सवाल करून उत्तर भारतीयांनीही महाराष्ट्र दिन साजरा केल्याचे शेलार यांनी सांगितले.

भाजप-सेनेपेक्षा काँग्रेसवाले बरे – राज ठाकरे</strong>
भाजप-शिवसेनेचे राज्य असताना संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी सजावट व कार्यक्रम करण्यास सरकार विसरले. त्यापेक्षा काँग्रेसवाले बरे होते, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केली. महाराष्ट्रदिनी दरवर्षी हुतात्मा स्मारक फुलांनी सजविलेले असायचे, पण यंदा तशी सजावट करण्यात आलेली नाही, हे लाजिरवाणे असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रापासून फारकत घेण्याची भूमिका कधीही नव्हती. शिवसेना-भाजप सत्तेत असताना या वास्तूचा मान राखला न जाणे हे दुर्दैवी असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. हुतात्मा स्मारक येथे कार्यक्रम व्हायला हवा होता, मात्र त्यांना येथे येण्याची लाज वाटत असावी, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.

Story img Loader