आपण काम करीत असलेल्या चित्रपटांचे चित्रीकरण अपुरे असून आणि त्यावर कोटय़वधी रुपये गुंतले आहेत, अशी सबब सांगत शरणागती पत्करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या विनंतीसाठी अभिनेता संजय दत्त याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्त दोषी असून त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला १८ एप्रिल रोजी शरणागती पत्करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने शरणागतीसाठी दिलेली मुदत संपण्यास अवघे तीन दिवस उरलेले असतानाच संजयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत शरणागतीस मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. आपण भूमिका करीत असलेल्या बहुतांशी चित्रपटांचे चित्रीकरण अपुरे आहे. या चित्रपटांमध्ये निर्मात्यांचे कोटय़वधी रुपये गुंतलेले आहेत. आपण दिलेल्या मुदतीत शरणागती पत्करली, तर या चित्रपटांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरणागती पत्करण्यास मुदतवाढ देण्याची विनंती संजयने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केली.
संजयसोबत झैबुन्निसा काझी, इसाक हजवाने आणि शरीफ परकार यांनीही सर्वोच्च न्यायालयात शरणागतीची मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मरकडेय काटजू यांनीही संजयची शिक्षा माफ करण्याची विनंती राष्ट्रपतींकडे केली आहे. त्यामुळे त्यावरील निर्णयापर्यंत संजय दत्तला शरणागतीसाठी मुदतवाढ मिळू शकते.
तुरुंग अधिकाऱ्यासमोर शरणागती पत्करण्याची  विनंती ‘टाडा’ न्यायालयाने फेटाळली
मुंबई बॉम्बस्फोट स्फोटांप्रकरणी न्यायालयाऐवजी तुरुंग अधिकाऱ्यासमोर शरणागती पत्करण्यास परवानगी देण्याची अभिनेता संजय दत्त याची विनंती विशेष ‘टाडा’ न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. ‘टाडा’ न्यायालयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्त दोषी ठरविले. मात्र त्याची शिक्षा एक वर्षांने कमी करीत ती पाच वर्षे केली. तसेच त्याला १८ एप्रिलपर्यंत संबंधित न्यायालयासमोर शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. त्याला न्यायालयाऐवजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करण्याची परवानगी द्यावी, अशी तोंडी विनंती संजयच्या वकिलांकडून न्यायालयाकडे करण्यात आली. परंतु शरणागतीची प्रक्रिया कायद्यानुसार म्हणजेच संबंधित आरोपीची ओळख, पडताळणी करूनच व्हायला हवी. त्यामुळेच संजयलाही न्यायालयासमोरच शरणागती पत्करावी लागेल, असे स्पष्ट करीत न्यायालयाने त्याची विनंती फेटाळून लावली. न्यायालयाने या खटल्यातील मोहम्मद कासम लाजपुरीया, दादा शरीफ परकार आणि इसाक हजवानी या आणखी तीन आरोपींची आरोग्याच्या कारणास्तव शरणागती पत्करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंतीही फेटाळून लावली.

Story img Loader