मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार संजय दत्त याचा जीव पहिल्याच दिवसापासून कारागृहात गुदमरू लागला आहे. आपण काही दहशतवादी नाही, असा दावा करीत आपल्याला अतिसुरक्षित आणि बंदिस्त ‘अंडासेल’मधून इतरत्र हलवा, अशी मागणीही त्याने वकिलाकरवी शुक्रवारी विशेष ‘टाडा’ न्यायालयाकडे केली.
आजारांची सबब पुढे करीत झोपायला गादी-उशी, खेळत्या हवेसाठी पंखा, घरचे जेवण, जेवणानंतर शतपावली अशी सुविधांची खैरात न्यायालयाकडून झोळीत पाडून घेत संजय गुरुवारी रात्री आर्थर रोड कारागृहात दाखल झाला. मात्र त्याच्या जिवाला धोका असल्याच्या कथित धमकीच्या पाश्र्वभूमीवर कारागृह प्रशासनाने सुरक्षेचा भाग म्हणून त्याला अतिसुरक्षित आणि बंदिस्त अशा ‘अंडासेल’मध्ये ठेवले. त्यामुळे संजयने शुक्रवारी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. बंदिस्त अशा ‘अंडासेल’मध्ये खेळत्या हवेच्या अभावामुळे संजयचा जीव गुदमरून त्याला अस्वस्थ वाटू लागते. शिवाय अन्य कैद्यांपासून सुरक्षा म्हणून सराईत गुन्हेगार वा दहशतवाद्यांना ‘अंडासेल’मध्ये ठेवले जाते. परंतु संजय हा दहशतवादी वा सराईत गुन्हेगार नाही. त्यामुळे त्याला ‘अंडासेल’मध्ये ठेवण्याची गरज नसून त्याला तेथून हलविण्याचे आदेश देण्याची विनंती संजयचे वकील रिझवान र्मचट यांच्याकरवी ‘टाडा’ न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने र्मचट यांना या विनंतीसाठी अर्ज करण्याची सूचना केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा