१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगण्यासाठी अभिनेता संजय दत्त गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईतील सत्र न्यायालयामध्ये शऱण आला.
टाडा न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांच्या न्यायालयात संजय दत्तने शरणागती पत्करली. न्यायालयाबाहेरील गर्दीतून वाट काढत संजय दत्तला आत यावे लागल्यामुळे त्याच्या छातीत दुखू लागले होते. न्यायाधीशांनी त्याला काही वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संजय दत्तचे वकील रिझवान मर्चंट यांनी संजय दत्तला कारागृहामध्ये घरचे जेवण, औषधे, फॅन, इलेक्ट्रॉनिक सिगारेट इत्यादी घेऊन जाण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक सिगारेट वगळता अन्य सर्व मागण्या मान्य केल्या. १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्तसह पाच जणांनी गुरुवारी न्यायालयामध्ये शरणागती पत्करली. यामध्ये युसूफ नळवाला, अल्ताफ सय्यद, केरसी अडजानीया आदींचा समावेश आहे.
तत्पूर्वी न्यायालयाच्या परिसरात माध्यमांच्या प्रतिनिधींनी आणि त्याच्या चाहत्यांनी केलेल्या गर्दीमुळे संजय दत्तला न्यायालयाच्या आवारात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे गाडीतून खाली उतरता आले नाही. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून संजय दत्तची गाडी न्यायालयाच्या इमारतीजवळ नेली. त्यानंतर खुद्द संजय दत्तने गाडीतून खाली उतरून ‘मला न्यायालयात शरण यायचे आहे. कृपया मला आत जाऊ द्या’, अशी विनंती केली. त्यानंतर गर्दीमध्येच तो न्यायालयाच्या इमारतीमध्ये गेला.
दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास संजय दत्त पत्नी मान्यता, निर्माते महेश भट यांच्यासोबत आपल्या निवासस्थानातून खाली उतरला. त्याने इमारतीच्या गेटच्या आतमधूनच बाहेर उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना आणि चाहत्यांना हात हालवून अभिवादन केले. स्वतःच्या इनोव्हा गाडीतून तो टाडा न्यायालयाकडे रवाना झाला. त्याच्यासोबत गाडीमध्ये त्याची बहिण खासदार प्रिया दत्त, पत्नी मान्यता यादेखील होत्या. संजय दत्तच्या गाडीपुढे आणि मागे सुमारे १५ गाड्यांचा ताफा होता. त्यामध्ये त्याचे खासगी सुरक्षारक्षक आणि इतर आप्तेष्ट होते.
पाली हिलमधून निघाल्यावर वांद्रे-वरळी सेतूमार्गावरून संजय दत्तच्या गाड्यांचा ताफा न्यायालयापर्यंत पोहोचला. संजय दत्तच्या गाडीपुढे पोलिसांची एक गाडी सुरक्षेसाठी ठेवण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा