मुंबई : मागाठाणे विधानसभा मतदार संघातील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे. ठाकरेंचा पक्ष आता माजी खासदार विनायक राऊत हेच चालवतात असा आरोप घाडी दांपत्याने केला आहे. तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही घाडी यांच्यावर आरोप केले असून संजना घाडी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कसे आरोप केले होते त्याच्या जुन्या चित्रफिती पुन्हा प्रसारित केल्या आहेत.

मागाठाणे विधानसभा मतदार संघातील एकेक करीत चार माजी नगरसेवक आतापर्यंत शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. शिवसेनेची दोन शकले पडली तेव्हा या मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे हे शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर या मतदार संघातील एकापाठोपाठ एक नगरसेवक ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. बाळकृष्ण ब्रीद, गीता सिंघण, रिद्धी व भास्कर खुरसुंगे पतीपत्नी यांनी एका पाठोपाठ ठाकरे यांचा पक्ष सोडला. आता माजी नगरसेवक संजय घाडी यांनीही पक्ष सोडला. त्यामुळे या मतदारसंघातील केवळ सुजाता पाटेकर व माधुरी भोईर या दोन नगरसेविका ठाकरे यांच्या पक्षात आहेत. सुजाता पाटेकर यांचे पती उदेश पाटेकर हे विधानसभा निवडणूकीत ठाकरे पक्षाचे उमेदवार होते. चार माजी नगरसेवकांनी ठाकरेंची शिवसेना सोडल्यामुळे मागाठाणे मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना अजूनच कमकुवत झाल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, घाडी यांनी पक्ष सोडताना उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यापेक्षा विनायक राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. ठाकरे यांचा पक्ष सध्या शिवसेना नेते विनायक राऊत चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विनायक राऊत हेच सध्या पक्षातील नियुक्ती करतात, तेच तिकीट वाटप करतात. राऊत हे कशापद्धतीने पक्ष चालवतात ते बऱ्याच जणांना माहीत आहे, असाही आरोप त्यांनी केला. संजना घाडी यांना प्रवक्ते पदावरून काहीही न सांगता हटवल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपल्या प्रभागात स्पोर्टस क्लब करायचा आहे, प्रसुतीगृह अद्ययावत करायचे आहे. अशा विकासकामांसाठी आपण हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ठाकरे यांचा पक्ष हा हिंदूत्वापासून खूप दूर गेला असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. आमच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यांना कोणतीही जबाबदारी दिली जात नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, घाडी यांच्याबरोबर कोणताही पदाधिकारी गेलेला नाही असा दावा ठाकरे पक्षातील मागाठाणेतील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. घाडी यांना नगरसेवक पद, संजना यांना प्रवक्ते पद आणि त्यांच्या मुलाला युवासेनेचे पद देऊनही पक्ष सोडला असा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच प्रवक्तेपदावर असताना घाडी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कशी टीका केली त्याच्याही ध्वनिचित्रफिती ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रसारित केल्या आहेत. मागाठाणे मतदारसंघातून आता जिंकून येण्याची खात्री नसल्यामुळे घाडी दांपत्याने हा निर्णय घेतला असल्याचाही आरोप कार्यकर्ते करीत आहेत. शिवसेनेतून मनसेमध्ये व नंतर पुन्हा शिवसेनेत आलेले घाडी यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे कोणताही आश्चर्याचा धक्का बसला नसल्याची प्रतिक्रियाही मागाठाणेतील ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.