संसदेमध्ये फेब्रुवारी २०१४ मध्ये ‘फेरीवाला कायदा’ मंजूर करण्यात आला असून बृहन्मुंबई महापालिकेने अद्याप त्याची ठोस अंमलबजावणी केलेली नाही. हा कायदा जोपर्यंत लागू केला जात नाही तोपर्यंत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करू नये, अशी मागणी मुंबई विभागीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. मुंबईत सुमारे दोन ते अडीच लाख फेरीवाले असून संसदेत मंजूर झालेल्या फेरीवाला कायद्यानुसार साडेतीन लाख फेरीवाल्यांना परवानगी मिळू शकते. पालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू केले असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. एका संस्थेने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत दोन ते अडीच लाख फेरीवाले असून यातील २२ हजार अधिकृत आहेत. अन्य फेरीवाल्यांकडून दरमहा हप्तावसुली केली जात असून ही रक्कम ३२४ कोटी रुपये इतकी आहे. महापालिकेतील शिवसेना व भाजप यांना फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली सुरू ठेवायची असल्यानेच फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Story img Loader