निरुपम यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस अडचणीत

सरकारने योग्य ती बाजू न मांडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील डान्सबारवरील बंदी उठविल्याचा आरोप करीत काँग्रेसने राज्यातील सत्ताधारी भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असताना डान्सबारवरील बंदी अयोग्य असल्याचे मत व्यक्त करीत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेसलाच अडचणीत आणले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठविल्यामुळे महाराष्ट्रात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. डान्सबारवर घातलेल्या बंदीबाबत सरकारने भक्कम बाजू न मांडल्यामुळेच न्यायालयाने हा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. संजय निरुपम यांनी मुंबई काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या संदर्भात भाजपवर टीकास्त्र सोडले.
भाजप सरकारने शेकडो करोडो रुपयांसाठी न्यायालयात ठोस भूमिका मांडली नाही आणि त्यामुळे डान्सबार बंदी उठविली गेली, असा आरोप करून संजय निरुपम म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने समाजातील वाढत्या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी डान्सबारवर बंदी घातली. काँग्रेस पक्ष डान्सबार बंदीच्या बाजूने आहे. मात्र माझ्या वैयक्तिक मतानुसार डान्सबार बंदीचा निर्णय अयोग्य होता. डान्सबारमध्ये काम करणाऱ्या नृत्यांगनांना रोजगार मिळत होता. बंदीमुळे त्यांचा रोजगार हिरावला गेला.
या मुद्दय़ावरून काँग्रेसने भाजप सरकारविरुद्ध प्रचार मोहीम उघडली असतानाच संजय निरुपम यांनी आपले वैयक्तिक मत व्यक्त केल्यामुळे काँग्रेस अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना धक्काच बसला असून संजय निरुपम यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई होण्याची शक्यता काही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली.

‘अनधिकृत झोपडय़ांना पाणी द्या’
पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो त्यांना पालिकेने द्यायलाच हवा. परंतु सत्ताधारी शिवसेना-भाजपला साथ देत मनसेने २००० नंतरच्या अनधिकृत झोपडय़ांना पाणी देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावत झोपडपट्टीवासीयांचे पाणी हिरावले आहे. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन या झोपडपट्टीवासीयांना पाणी द्यावे, असे आवाहन संजय निरुपम यांनी या वेळी केले.

Story img Loader