संजय निरुपम यांचा विरोध

आघाडीत मनसेला सोबत घेण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली असली तरी काँग्रेसमध्ये मनसेशी समझोता करण्यावरून दोन मतप्रवाह आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मनसेला बरोबर घेण्यास ठाम विरोध दर्शविला असला तरी मतांचे विभाजन टळणार असल्यास मनसेची मदत घेण्यास काय हरकत आहे, असाही पक्षात एक मतप्रवाह आहे.

मनसेला आघाडीत सोबत घ्यावे, असा प्रस्ताव आघाडीची चर्चा सुरू झाली तेव्हाच राष्ट्रवादीने मांडला होता. पण काँग्रेस नेत्यांनी  त्याला ठाम विरोध केला होता. नंतर हा विषय मागे पडला. अलीकडेच शरद पवार यांनी मनसेला आघाडीत सहभागी केले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. तरीही अजित पवार यांनी मनसेला सोबत घेण्याची भूमिका मांडली आहे. मुंबईतील एका बिल्डरच्या कार्यालयात अजित पवार आणि राज ठाकरे यांची बुधवारी भेट झाली. यानंतर गुरुवारी पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांनी मनसेला बरोबर घेण्याचा प्रस्ताव मांडला. काँग्रेसला अपशकून करण्याचा राष्ट्रवादीच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये उमटली आहे.

मनसेला काँग्रेसचा विरोध आहे. तरीही राष्ट्रवादीने ही चर्चा सुरू का केली याची कल्पना नाही, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने मनसेचा विषय प्रतिष्ठेचा केल्यास आम्ही राहुल गांधी यांच्याकडे भूमिका मांडू, असेही निरुपम म्हणाले. निरुपम मनसेला बरोबर घेण्याच्या ठाम विरोधात असतानाच मिलिंद देवरा यांनी मनसेबाबत अनुकूल भूमिका घेतली आहे.

मनसेला बरोबर घेतल्यास उत्तर प्रदेश, बिहार आदी पट्टय़ांमध्ये काँग्रेसला अवघड जाऊ शकते. मुंबईतील एक-दोन जागांसाठी उत्तर भारतात मतदारांची नाराजी पत्करणे काँग्रेसला शक्य होणार नाही. मनसेचा घसरता आलेख लक्षात घेता त्याला जवळ कशाला करायचे, असाही सवाल काँग्रेसमध्ये केला जात आहे.

Story img Loader