मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. सोमवारी सायंकाळी त्यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन बदली करून त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सोमवारी गृहविभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले. अवघ्या दहा दिवसांत गृहमंत्रालयाने राज्य पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त या दोन महत्त्वाच्या पदांवर मोठे फेरबदल केले आहेत. संजय पांडे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार पहिला आहे.
‘अँटिलिया’ स्फोटक प्रकरण व मनसुख हिरण यांची हत्या या दोन प्रकरणानंतर गेल्या वर्षी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्याजागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली होती़
गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन प्रमुख रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. तर, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी सोपविण्यात आली होती. यामुळे नाराज झालेल्या पांडे यांच्याकडे एप्रिल २०२१ मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
राज्याच्या पोलीस महासंचालक पदी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या प्रक्रियेनुसार राज्य सरकारने एक यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (युपीएससी) पाठविली होती. आयोगाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महासंचालकाच्या पात्रता यादीतून पांडे यांचे नाव वगळून महासंचालकपदासाठी हेमंत नगराळे, रजनीश सेठ आणि डॉ. के. वेंकटेशम या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली होती. राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळावी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात असताना आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार राज्य शासन पोलीस महासंचालक पदावर अधिकाऱ्याची नियुक्ती करत नसल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढल्याने अखेर सरकारने दहा दिवसांपूर्वी रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. यामुळे संजय पांडे यांना या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. राज्य शासनाने सोमवारी नव्याने आदेश काढत राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली.