मुंबई : पुणे येथे फेब्रुवारी २०२१ मध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून तरुणीचा झालेला मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्या होती हा निष्कर्ष कशाच्या आधारे काढण्यात आला ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारकडे केली. तसेच, त्याबाबतच्या तपासाचा तपशील पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.

शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते संजय राठोड यांच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या आणि प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने उपरोक्त विचारणा करून तपासाचे तपशील सादर करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : दीपक देशमुख यांची अटक बेकायदा ठरवून जामिनावर सुटकेचे आदेश

या तरुणीचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघात होता या निष्कर्षाप्रती पोहोचून पोलिसांनी प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल कनिष्ठ न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल न्यायालयानेही स्वीकारला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी देखील तपासाला आपला आक्षेप नाही, असे सांगणारी याचिका उच्च न्यायालयात केली आहे, असे असले तरी या तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या होती या निष्कर्षाप्रती पोलीस कशाच्या आधारे पोहोचले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, त्याबाबतचा तपशील पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.

तत्पूर्वी, ही तरुणी मद्याच्या नशेत घराच्या गच्चीत फिरत होती. त्यावेळी, गच्चीतून पडून तिचा मृत्यू झाला. डोक्याला दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्याचे राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर, न्यायालयाने उपरोक्त विचारणा केली.

हेही वाचा – मुंबई : अंगावर पाणी उडाल्याने अन्नपदार्थ घरी पोहोचविणाऱ्याने केला चाकू हल्ला

प्रकरण काय ?

टिकटॉक व्हिडोओसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील तरुणीचा ८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या मृत्यूमुळे महाराष्ट्रातील एकूणच वातावरण ढवळून निघाले होते. राज्यातील राजकारणात एकच गदारोळ झाला होता. त्यातच सदर तरुणीचे राठोड यांच्याशी नाव जोडले गेले. तसेच, तिच्या राठोड यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणाच्या ११ ध्वनीचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या होत्या. राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे आरोप झालेले असतानाही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा आरोप करून राठोड यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी वाघ यांनी २०२१ मध्येच उच्च न्यायालयात याचिका केली होती. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही वाघ यांनी याचिकेद्वारे केली होती.