मुंबई : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून ज्या योजना सुरू केल्या, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात बंद केल्या जात आहेत, पण अदानींच्या योजना सुरू आहेत. केवळ गरीबांच्या योजना का बंद केल्या जात आहेत? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या सरकारच्या काळातील योजना बंद करण्यात येत आहेत, यावर शिंदेंनी आवाज उठवायला हवा, असा सल्ला शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर लाडका भाऊ, आनंदाचा शिधा या योजना बंद केल्या जात आहेत. यावर एकनाथ शिंदेंनी आवाज उठवला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या काळात जेव्हा ‘शिवभोजन थाळी’ सुरू केली तेव्हा एकनाथ शिंदे मंत्री होते. त्या योजनेचे शिंदेंनी उद्घाटन केले आहे. गरीबांच्या योजना का बंद होतात, हा प्रश्न सरकारमधील लोकांनी मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
गरिबांचे बेरोजगारीला कंटाळून पलायन तानाजी सावंत यांचा मुलगा पळून गेला की त्याचे अपहरण झाले हे त्यांनीच सांगितले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये खंडणी, अपहरण आणि पलायन अशी प्रकरणे रोज घडत आहेत, यात काही नवे नाही. पण श्रीमंतांची मुले स्वत:च्या विमानाने बँकॉकला पळून जातात आणि गारिबांची मुले बेरोजगारीला कंटाळून रेल्वे फलाटावरून कुठेतरी निघून जात आहेत, अशी टीका राऊत यांनी तानाजी सावंत यांच्या पुत्राबाबत बोलताना केली.
अण्ण हजारेंची भूमिका संशयास्पद
नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये देशात आणि महाराष्ट्रात अनेक घोटाळे झाले, पण अण्णा हजारे यांनी साधी कूसही बदलली नाही. ते भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले. आताही त्यांची भूमिका संशयास्पद आहे. ते गांधीवादी आहेत, त्यांच्यासारखी सत्याची कास अण्णा हजारेंनी धरली तर आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे संजय राऊत म्हणाले.