शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाच्या वनमंत्री राहिलेल्या एका नेत्याने एक वर्षापूर्वी मुंबईत मुलीच्या लग्नात साडेनऊ कोटी रुपयांचं कारपेट टाकल्याचा गंभीर आरोप केला. तसेच ईडीला हे दिसलं नाही का? असा सवाल केला. ते मुंबईत शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “एक वर्षापूर्वी मुंबईत एक लग्न झालं. भाजपाच्या नेत्याच्या मुलीचं लग्न झालं. आम्ही काही बोललो का? ते वनमंत्री होते म्हणून त्यांनी लग्नाचा सेट जंगलाचा केला. त्याला जंगलाचा फील यावा म्हणून त्यांनी जे कारपेट टाकलं होतं त्याची किंमत साडेनऊ कोटी रुपये होती. ईडीला हे दिसलं नाही का? आम्ही म्हणतो घरातील लग्न आहे. घरात शिरायचं नाही, पण आमच्या घरात तुम्ही अशा पद्धतीने शिरता.”
“जेलमध्ये टाकणार असाल तर टाका, मी तयार आहे”
“मुलांच्या घरात शिरताय, मुलांच्या कामाच्या ठिकाणी शिरताय, दादागिरी करताय, देख लेंगे बोलताय. अरे बघ ना, मी सांगतो बघा. बघून घ्या सांगणारा मी पहिला माणूस आहे. जेलमध्ये टाकणार असाल तर टाका, मी जायला तयार आहे, पण माझ्यासोबत तुम्ही देखील सगळे असाल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
हेही वाचा : Sanjay Raut Press Conference Live: हिंमत असेल तर ईडीने माझ्या घरी यावं – संजय राऊत
“आमच्या मुलीच्या लग्नाच्या हिशोबाला लागले आहेत. फुलवाले, पताकावाले, मेहेंदीवाले, नेलपॉलिश करणारे यांच्याकडे ईडी गेली. किती पैसे दिले असं ईडीने विचारलं. हे ईडीचं काम आहे? गुजरातमध्ये यांच्या डोळ्यासमोर २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यांनी दोन वर्षे एफआयआर घेतली नाही,” असं म्हणत राऊतांनी गंभीर आरोप केला.