शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) ११ वा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त देशभरातील त्यांचे चाहते आणि शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर) येत असतात. आदल्या दिवसापासूनच शिवतीर्थावर गर्दी जमू लागते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनीदेखील काही वेळापूर्वी शिवतीर्थावर जाऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. तसेच तिथला बंदोबस्त आणि सुविधांची पाहणी केली. एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी जमली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमल्यामुळे बराच वेळ तिथे तणाव निर्माण झाला होता.
शिवतीर्थावर दाखल झालेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांकडे पाहून घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचं मोठ्या राड्यात रुपांतर झालं. शिवतीर्थावर शिवसैनिकांनी एकमेकांना धक्काबुक्कीदेखील केली. तसेच या राड्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकाचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही गटांमध्ये मोठा राडा झाल्याने शिवाजी पार्क परिसरात तणाव वाढला आहे. परिणामी मुंबई पोलिसांचं एक पथक शिवतीर्थावर दाखल झालं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परबदेखील शिवतीर्थावर दाखल झाले. ठाकरे गटाच्या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आली. पाठोपाठ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केदेखील शिवतीर्थावर पोहोचले.
या सगळ्या प्रकारावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर घटनेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासह संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, शिवतीर्थावरील आदरणीय शिवसेना प्रमुखांचे स्मृतीस्थळ पवित्र आहे. त्याचे पावित्र्य राखायला हवे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळावर औरंग्याची पिलावळ जाणे मान्य नाही. त्याप्रमाणे शिवतीर्थावर अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नाही. अन्यथा पावित्र्य भंग होईल. त्यामुळे शिवसैनिक एका निष्ठेने भिडणाराच! जय महाराष्ट्र!
हे ही वाचा >> VIDEO : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे गट – शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, पोलीस पथक घटनास्थळी
दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेले शिवसेना नेते अनिल देसाई यांनीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली. देसाई म्हणाले, “आमच्यासाठी उद्याचा दिवस खूप खास आहे. आम्ही शांततेनं इथे जमलो होतो. आम्हाला श्रद्धांजली वाहायची आहे. काही लोक इथे तमाशा करण्यासाठी येत आहेत. परंतु, कोणीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, अनर्थ घडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तसं होऊ देणार नाही. आम्ही खंबीरपणे इथे उभे आहोत.” दरम्यान, देसाई यांना स्मृतीस्थळाच्या नुकसानाबाबत विचारले असता अनिल देसाई म्हणाले, काहींनी हा प्रकार केला. बाकीच्या गोष्टी नंतर बघू. आत्ता त्या लोकांना इथून निघू द्या. सध्या आपण संयमाने राहू. मी आमच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.