उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील २०२० मध्ये त्याला अटक केली तेव्हा शिवसेनेचा नाशिक शहरप्रमुख होता, असा आरोप केला. आता त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत गृहमंत्री फडणवीस खोटं बोलत असल्याचा आरोप केला. तसेच कोण कधी शहरप्रमुख होतं याची यादी आम्ही जाहीर केल्याचंही सांगितलं. ते रविवारी (२२ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस खोटं बोला, पण रेटून बोला याला जागून वागत आहेत. कालच पाहिलं की, कुणी तरी एक ड्रग्ज माफिया मुंबईत पकडला आहे आणि चेन्नईत, बंगळुरूत पकडल्याचं सांगत आहेत. हे म्हणतात की, तो शिवसेनेचा नाशिक शहर प्रमुख होता. आम्ही कोण कोण कधी कधी शहर प्रमुख होतं त्याची यादी दिली आहे.”

“गृहमंत्री फडणवीस किती खोटं बोलत आहेत”

“ललित पाटील साधा शिवसेनेचा उपशाखाप्रमुख किंवा गटप्रमुखही नव्हता. जे लोक फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसले आहेत तेच लोक त्याला पोसत होते. गृहमंत्री फडणवीस किती खोटं बोलत आहेत,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

“फडणवीसांचं त्यांच्या गृहखात्यावर नियंत्रण नाही”

संजय राऊत पुढे म्हणाले, “एकतर फडणवीसांचं त्यांच्या गृहखात्यावर नियंत्रण नाही किंवा त्यांचा गुप्तचर विभाग त्यांना चुकीची माहिती देत आहे. इतका अपयशी गृहमंत्री महाराष्ट्राने पाहिला नव्हता.”

“यांना घाम फुटला आहे, म्हणून ते…”

“आता पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करावा. सध्या मंत्रिमंडळातील जे सर्व पोपट बोलत आहेत ते घाबरून बोलत आहेत. यांना घाम फुटला आहे. म्हणून ते आरोप करत सुटले आहेत,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

हेही वाचा : “बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजपा अध्यक्ष होता, असं…”; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…

“भाजपाच गुंडांचा पोशिंदा आहे”

“नाशिकसह अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी कोण पोसत आहे, ड्रग्ज माफियापासून खुनी, चोर, दरोडेखोरांना कोण पोसतंय? ज्यांच्यावर ईडी, सीबीआयचे खटले होते असेच लोक भाजपाबरोबर गेले, त्यांच्याबरोबर भाजपाने सरकार बनवलं. त्यामुळे भाजपाच गुंडांचा पोशिंदा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्या नेत्यांना ईडी, पोलीस अटक करायला निघाले होते ते सगळे भाजपाबरोबर गेले,” असंही राऊतांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut answer allegations of devendra fadnavis in lalit patil drugs case pbs
Show comments