१०० हून अधिक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर तुरुंगाबाहेर आलेले शिवसेना खासदार संजय राऊत मवाळ भूमिका घेत असल्याची टीका झाली. मात्र, आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. “टीका करणाऱ्यांनी आपलं कर्तुत्व काय याचा आधी विचार करावा,” असा हल्लाबोल राऊतांनी केला. ते शुक्रवारी (११ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष वेधून घेणं भाजपाच्या नेत्यांचं काम झालंय. याचा अर्थ ते स्वतःच्या कामावर उभे नाहीत. त्यांना आमच्यावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवायची असेल, तर त्यांनी हे थांबवायला हवं.”
“टीकाकारांनी आपलं कर्तुत्व काय याचा विचार करावा”
“शरद पवार व उद्धव ठाकरे हे देशाचे प्रमुख नेते आहेत. अशी चिखलफेक करणाऱ्यांनी याचं भान ठेवावं. शरद पवार व उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी आपलं कर्तुत्व काय आहे याचा विचार करावा,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “कोणालाही सोडणार नाही”, फडणवीसांच्या ट्वीटवर संजय राऊतांना प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले, “याचा अर्थ…”
“तुम्ही अशी विधानं केली, तर मग आम्ही आहोतच”
संजय राऊत पुढे म्हणाले, “आपल्या हातात अमर्याद सत्ता आहे म्हणून ते आमच्या नेतृत्वावर अशी विधानं करत आहेत. त्यांनी काय विधान केलंय मला माहिती नाही, मला माध्यमांकडून माहिती मिळतीय. मात्र, अशी विधानं कोणीही करू नये. आम्ही करत नाही, तुम्हीही करू नये. तुम्ही अशी विधानं केली, तर मग आम्ही आहोतच.”