राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२१ मधील भेटीचा उल्लेख करत मोठा दावा केला. मोदींबरोबरच्या त्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं मत बदललं होतं आणि ते परत भाजपाबरोबर येण्यास तयार होते, असा दावा सुनील तटकरेंनी केला. या दाव्यावर आता ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत संजय राऊत म्हणाले, “मी असं काहीही बोललो नाही आणि माझी सुनील तटकरेंशी अशी भेट कधीही झालेली नाही. जेव्हा उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले तेव्हा अजित पवार आणि अशोक चव्हाणही उपस्थित होते.”

“उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी खासगीत दीड तास बोलले”

“त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी खासगीत दीड तास बोलले. तेथे जी चर्चा झाली त्याविषयी उद्धव ठाकरेंनी परत आल्यावर आम्हाला माहिती दिली. त्यामुळे सुनील तटकरे खोटं बोलत आहेत. हे खरं आहे की, भाजपालाच शिवसेनेशी पुन्हा जुळवून घ्यायचं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्याला नकार दिला,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

सुनील तटकरे काय म्हणाले?

सुनील तटकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी २०२१ मध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर माझी संजय राऊतांबरोबर बैठक झाली तेव्हा मला कळलं की, दिल्लीतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींबरोबर एकांतात चर्चा झाली.”

“उद्धव ठाकरे पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा विचार करत होते”

“माझी संजय राऊत यांच्याबरोबर बैठक झाली तेव्हा तेथे एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरही हजर होते. त्यावेळी संजय राऊतांनी मला सांगितलं की, मोदींबरोबरच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे आपलं मत बदलण्याची शक्यता होती आणि ते पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा विचार करत होते,” असंही सुनील तटकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “दीपक केसरकर एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून…”; संजय राऊतांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

“राऊतांनी आमच्यावर टीका करताना विचार करून भाषा वापरावी”

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही बैठक दिल्ली भेटीनंतर १५ दिवसांनी झाल्याचंही तटकरेंनी नमूद केलं. तसेच संजय राऊतांनी आमच्यावर टीका करावी, मात्र भाषा विचार करून वापरावी, असा इशारा दिला. राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर अनावश्यक टीका करण्याची गरज नाही, असंही तटकरेंनी म्हटलं.

Story img Loader