शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मराठा मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा आरोप करत संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार टीका केली. यावरून आता संजय राऊतांनी संभाजीराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. “संभाजीराजे प्रगल्भ नेते आहेत असं म्हणत भाजपाच्या नादाला कुठे लागलेत,” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. ते सोमवारी (१९ डिसेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “माझ्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली. संभाजीराजे एक प्रगल्भ नेते आहेत. आमचा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा आहे. हे भाजपाच्या नादाला कुठे लागलेत आणि मोर्चा-मोर्चा, आमचा मोर्चा मोठा की तुमचा मोर्चा मोठा असं कुठे म्हणत आहेत. सगळे मोर्चे आपलेच आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाा मुद्दा घेऊन उभे आहोत. मग आपण सगळे त्यावरच बोलुयात. इतकच मी छत्रपतींना आवाहन करतो.”
“मराठा मोर्चालाही हे लोक नॅनो मोर्चा म्हणत होते”
ट्वीट केलेल्या व्हिडीओवरून वाद झाला त्यावर संजय राऊत म्हणाले, “मराठा समाजाचा मोर्चा आमचा नव्हता का? मी तो व्हिडीओ महाविकासआघाडीचा असल्याचं कुठंच म्हटलेलं नाही. तुम्ही ते ट्वीट काळजीपूर्वक पाहा. त्यात मी कुठेही दावा केलेला नाही की, हा महाविकासआघाडीचा मोर्चा आहे. मराठा मोर्चालाही हे लोक नॅनो मोर्चा म्हणत होते. मात्र, तो मोर्चाही प्रचंड मोठा होता.”
“विराट मोर्चे निघाले की, त्यांना नॅनो मोर्चे म्हणायचं अशी भाजपाची प्रथा”
“महाविकासआघाडीचा आणि मराठा मोर्चा दोन्ही ताकदीचे होते. दोन्ही मोर्चे न्यायहक्कासाठी होते आणि दोन्ही मोर्चे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निघाले होते. मराठा मोर्चात सहभागी झालेले अनेकजण मविआच्या मोर्चातही होते. त्यावर भाजपाला इतकं कळवळून टीका करण्याचं कारण नाही. असे विराट मोर्चे निघाले की त्यांना नॅनो मोर्चे म्हणायचं अशी भाजपाची प्रथा आहे. त्यावरच मी टीका केली आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
“मी कुठं म्हटलं तो आमचा मोर्चा आहे”
संजय राऊत पुढे म्हणाले, “मराठा मोर्चा तो आमचा मोर्चा आहे असं म्हणत असेल तर त्यांचा आहे, मी कुठं म्हटलं आमचा मोर्चा आहे. तुम्ही पुन्हा एकदा माझं ट्वीट पाहा. न पाहता टीका केली जात आहे. ते त्यांच्या आयटी विभागाला कामाला लावत आहेत. मी मराठा मोर्चाच्या व्हिडीओला तो मविआचा मोर्चा आहे असं म्हटलं असतो, तर टीकेला वाव होता.”
हेही वाचा : संजय राऊतांनी ट्वीट केलेला VIDEO मराठा मोर्चातला? फडणवीसांकडून प्रश्न उपस्थित
“भाजपाने शिवाजी महाराजांच्या अपमानावर बोलावं”
“मराठा मोर्चाही आमचा होता. त्या मोर्चानेही महाराष्ट्राची ताकद दिल्लीला दाखवली आणि कालच्या मविआच्या मोर्चानेही महाराष्ट्राची ताकद दिल्लीला दाखवली. असे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे मोर्चे निघाले की, नॅनो मोर्चा, शेपटा ओढा मोर्चा असं सुरू होतं. अशी टीका करण्यापेक्षा भाजपाने शिवाजी महाराजांच्या अपमानावर बोलावं,” असंही राऊतांनी नमूद केलं.