Sanjay Raut on Mahim Assembly constituency : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्वांचं २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे. ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार आहे. मात्र, राज्यातील इतर पक्ष देखील या निवडणुकीत उतरले आहेत. सध्या राज्यभरात विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, प्रचारफेऱ्या चालू आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. अनेक मतदारसंघ दिग्गज उमेदवारांमुळे, रंगतदार लढतींमुळे चर्चेत आले आहेत, यापैकीच एक म्हणजे मुंबईतील माहीमचा मतदारसंघ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे या माहीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. तसेच निवडणूक लढवणारे ते ठाकरे घराण्यातील आजवरचे केवळ दुसरेच (आदित्य ठाकरे यांच्यानंतर) ठाकरे आहेत.

माहीमच्या मतदारसंघात अमित ठाकरेंचा सामना येथील विद्यमान आमदार सदा सरवणकर (एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार) व ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांच्याशी होणार आहे. सावंत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. तर, सरवणकर महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र, महायुतीमधील भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघात अमित ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

हे ही वाचा >> “मराठा मतं बोटांवर मोजण्याइतकी…”, व्हिडीओ व्हायरल होताच बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण

अमित ठाकरेंच्या काकांनी विरोधात उमेदवार दिला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीला उभे राहिले होते. पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील कोणीतरी निवडणूक लढवत होतं. त्यावेळी मनसे अध्यक्ष व आदित्य यांचे काका राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. यंदा अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली होती की अमित ठाकरेंचे काका उद्धव ठाकरे देखील आपल्या पुतण्याविरोधात उमेदवार देणार नाहीत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी तसं केलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर टीका झाली.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”

आम्हाला माहीममध्ये लढावंच लागेल : संजय राऊत

दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला की शिवसेनेने (ठाकरे) माहीममध्ये उमेदवार का दिला? यावर राऊत म्हणाले, “कोणत्या पक्षाने कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणी कुठे लढावं याचा निर्णय तो किंवा त्याचा पक्ष घेत असतो. प्रत्येकजण आपापला प्रश्न सोडवत असतो. आम्ही त्यावर आमचं कोणतंही मत व्यक्त केलेलं नाही. आम्ही केवळ इतकंच म्हणालो की दादर, माहीम, प्रभादेवी या भागात शिवसेनेचा जन्म झाला आहे. हे शिवसेनेचं जन्मस्थान आहे. शिवसेनेचं जन्मस्थान इतर कोणालाही देता येणार नाही. तो आमच्यासाठी भावनिक विषय आहे. राजकारणात असे अनेक भावनिक विषय असतात. दादर हा आमच्यासाठी भावनिक विषय आहे. कारण आमच्या पक्षाचा इथे जन्म झाला आहे शिवतीर्थ त्याच मतदारसंघात आहे ७७ ए, रानडे रोड हा शिवसेनेचा पूर्वी पत्ता होता. त्याच ठिकाणी आमची शिवसेना मोठी झाली. त्यामुळे आम्हाला त्या मतदारसंघात लढावच लागेल. ज्या मतदारसंघात आमचा पक्ष जन्माला आला त्या मतदारसंघात लढणं आम्हाला भाग आहे. ही आमची भूमिका आहे. त्या मतदारसंघात आणखी कोणी लढत असेल तर आमचा त्यावर काही आक्षेप नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut answer why uddhav shivsena candidate in mahim assembly against amit thackeray asc