मुंबई : पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. राऊत सोमवारीच विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.
बुधवारी राऊत यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. नेमक्या कोणत्या कारणास्तव राऊत यांनी जामिनाची मागणी केली आहे, याची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही. पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयीने कोठडी सुनावल्याने राऊत हे सध्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. तसेच तेथे सध्या ते पत्राचाळ प्रकरणावर पुस्तक लिहीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.