शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “दिल्लीवरून आलेल्या आदेशानुसार कोश्यारींनी आम्हाला नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ दिली नाही,” असा आरोप राऊतांनी केला. तसेच त्यांचं मोठं कारस्थान असल्याचंही त्यांनी नमदू केलं. ते रविवारी (१४ मे) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “वेळकाढूपणा हेच त्यांचं धोरण आहे. ते त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, हे वेळकाढूपणाचं धोरण फार चालणार नाही. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची लुट करणाऱ्यांना या वेळकाढूपणाचा फायदा होणार नाही. त्यांना निर्णय लवकरात लवकर द्यावा लागेल.”
“विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आम्हाला घेऊ दिली नाही”
“पक्षांतर हा राहुल नार्वेकरांचा छंद आणि व्यवसाय आहे. तरीही त्यांना हा निर्णय लवकर द्यावा लागेल. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आम्हाला घेऊ दिली नाही. ही निवडणूक सहजशक्य होती. तेव्हा बहुमताचं सरकार होतं. मात्र, या बदमाश, लफंग्या राज्यपालांनी आम्हाला ती निवडणूक घेऊ दिली नाही. असं करण्यासाठी त्यांना दिल्लीचे आदेश होते. कारण त्यांचं कारस्थान मोठं होतं,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
“इतिहासात त्यांची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात होईल”
संजय राऊत पुढे म्हणाले, “यानंतर विधानसभा अध्यक्षपदी अशी व्यक्ती बसवण्यात आली ज्याला लोकशाहीची चाड नाही. पक्षांतराविषयी राग नाही आणि पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. अशा व्यक्तीला घटनात्मक पदावर बसून शिवसेनेबाबत हवे ते निर्णय करून घेण्यात आले. इतिहासात त्यांची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात होईल.”
हेही वाचा : “राहुल नार्वेकर लंडनमधून मुलाखत देऊन शिवसेनेचे उरलेले १६ आमदार…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
“भविष्यात यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल”
“भविष्यात यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. मराठी जनता त्यांना सोडणार नाही. आज राज्यात राज्यपालांची काय किंमत राहिली आहे. त्यांची निर्लज्ज राज्यपाल म्हणून नोंद झाली आहे,” असंही राऊतांनी नमूद केलं.