Sanjay Raut on Satyanarayan Chaudhary Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे की राज्यातील पोलीस हे गुडांच्या टोळ्यांबरोबर मिळून महायुतीसाठी काम करत आहेत. मात्र सरकार बदलल्यावर या सर्वांचा हिशेब केला जाईल. राऊत म्हणाले, “भाजपा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी मुंबईतील अनेक मतदारसंघांत ठाणे व पुण्यातील अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार काम करत आहेत. कधीकाळी अंडरवर्ल्डच्या टोळ्यांमध्ये सहभागी असलेले लोक भाजपा व शिंदेंसाठी निवडणुकीचं काम करत आहेत. राजकीय पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक करतात, त्याचप्रमाणे भाजपा व शिंदेंच्या पक्षाने अनेक विधानसभा मतदारसंघात गुंडांच्या टोळ्या नेमल्या आहेत. आपले संपर्कप्रमुख असतात तसे त्यांनी गुंडांच्या टोळ्यांचे म्होरके नेमले आहेत. कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दादर, ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, कलिना, कुर्ला भागात हे गुंड व त्यांच्या टोळ्या निवडणुकीचं काम करत आहेत. त्यासाठी त्यांना जामिनावर सोडवून आणलं आहे, तसेच त्यांना भाजपा व शिवसेनेत (शिंदे) प्रवेश दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुंडांच्या बैठका होतात. वरिष्ठ पोलीस अधिकारी, आयपीएस दर्जाचे अधिकारी व या गुंडांच्या विविध मतदारसंघांत बैठका होत आहेत. निवडणुका जिंकून देण्यासाठी रात्री बैठका होतात. आम्ही निवडणूक आयोगला यासंदर्भात माहिती देणार आहोत. हे पोलीस महाविकास आघाडीला मदत करणारे कार्यकर्ते, तसेच ज्यांच्यावर राजकीय गुन्हे आहेत त्यांना तडीपार करतात. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांच्याकडे पोलिसांना पाठवायचं, त्यांच्या घरी किंवा गावी कोण आहे याचा शोध घ्यायचा, त्यांना धमक्या द्यायच्या, असे सगळे पराक्रम चालू आहेत.

हे ही वाचा >> अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”

थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेत म्हणाले…

शिवसेना (ठाकरे) खासदार म्हणाले, कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, सरकार बदलत असतं, सरकार जातं, येतं. गुडांच्या मदतीने तुम्ही ज्या कोणाला मदत करू इच्छिता त्यांचेही दिवस फिरतील. तुम्ही पोलीस खात्याला कलंक लावत आहात. मुंबई आणि महाराष्ट्राचं पोलीस खातं तुम्ही बेआब्रू करत आहात. सत्यनारायण चौधरी, तुम्ही कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख आहात, मात्र, तुमच्यासमोर काय जळतंय ते पाहा, आम्हाला जास्त बोलायला लावू नका. सरकार बदलत आहे हे लक्षात घ्या. सर्वांचा हिशेब केला जाईल. माझ्याकडे यादी मागितली तर मी गुंडांची यादी द्यायला तयार आहे. कोणत्या अधिकाऱ्याच्या कोणत्या गुंडाबरोबर बैठका होतायत, वर्षा बंगल्यावरून कोणत्या सूचना दिल्या जातायत ते मी सांगू शकतो. सत्यनारायण चौधरी कोणासाठी काम करतायत त्यांची नावं मी देऊ का? मला धमक्या देऊ नका, एवढंच सांगतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut claims police and criminals working together for mahayuti in maharashtra assembly election 2024 rno news asc