शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनसीबी, समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरवर आपली भूमिका स्पष्ट केली. क्रांती रेडकर मराठी मुलगी आहे. तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. पण एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी बाहेरून येऊन इथं महाराष्ट्रातील मराठी लोकांना त्रास देत आहेत, असाही आरोप केला. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
संजय राऊत म्हणाले, “एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकरवर व्यक्तिगत कुणी टीका टीपण्णी केलीय असं मला वाटत नाही. मी तसं पाहिलं नाही. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी बाहेरून येऊन इथं आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. त्रास देण्यात येणारे लोक मराठीच आहेत ना. ते काय अमराठी आहेत का?”
“अशोक चव्हाण, अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का?”
“दिल्लीतून तपास यंत्रणांचं आक्रमण सुरू आहे. कारण नसताना मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न होतोय. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी पडत आहेत. निवडणुकीच्या तोंडवर देगलूरला धाडी पडल्यात. अशोक चव्हाण, अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का? इथं मराठी तर सगळेच आहेत,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
“प्रश्न मराठी अमराठीचा नाही, तर सत्य असत्याचा आहे”
संजय राऊत म्हणाले, “प्रश्न मराठी अमराठी असण्याचा नाही, सत्य असत्याचा आहे. क्रांतीवर अन्याय होणार नाही. पण केंद्राच्या यंत्रणा राज्यात ज्या प्रकारे मागे लागल्यात व त्यानंतर आता ज्या गोष्टी समोर आल्यात त्यामुळे सगळ्यांना घाम फुटायला लागलाय,”
“क्रांती रेडकर विषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तिच बाळासाहेबांच्या विचाराची आहे. हे ठाकरे सरकार आहे. शरद पवारही आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथं कुणावरही अन्याय होणार नाही,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.