राज्यात महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्यांवरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्यानंतर अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतची पीए दिशा सालियनच्या आत्महत्येचं प्रकरण उपस्थित केलं. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची घोषणा केली. यानंतर आता दिशा सालियनच्या घरी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच दिशाच्या वडिलांना माध्यमांसमोर येऊ दिलं जात नाही, असा आरोप होतो आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते रविवारी (२५ डिसेंबर) माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “दिशा सालियनच्या कुटुंबियांना माध्यमांशी बोलू न देणं ही दडपशाही आहे. दहशत माजवण्याचा प्रकार आहे. सुपारीबाज लोक सत्तेवर आली की काय होतं ते सुरू आहे. ही दडपशाही आहे. उद्या त्यांच्यामागे ईडीही लावतील, सीबीआय लावतील.”

“ते बिचारे साधे लोक आहेत”

“ते बिचारे साधे लोक आहेत. याआधीही दिशाच्या आई-वडिलांनी काही भूमिका अनेकदा स्पष्ट केल्या आहेत. त्या भूमिका ते पुन्हाही स्पष्ट करतील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत”

ठाण्यातील बिल्डरच्या आत्महत्याप्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “आमचे खासदार अरविंद सावंत यांनी एक विषय मांडला. ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. लावा त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशी. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि भाजपा त्यांना पाठीशी घालत आहे. लावा चौकशी, करा एसआयटी.”

“सुरज परमार यांच्या डायरीवर एसआयटी स्थापन करा”

“राज्यपालांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अपमानाच्या वक्तव्यांची एक मालिकाच चालवली आहे. असं होऊनही भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावर बसून आहेत आणि भाजपा त्यांचं भजन गात आहे. हा काय प्रकार आहे? एसआयटी यावरच स्थापन झाली पाहिजे. एसआयटी सुरज परमार यांच्या डायरीवर स्थापन झाली पाहिजे.मात्र, ते तसं करत नाहीत. ते विरोधीपक्षांवर एसआयटी लावत आहेत. इतकं सुडबुद्धीने वागणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच आलं नव्हतं,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“जे खोके वाटले आहेत ते वसूल करण्यासाठी हे सरकार…”

संजय राऊत पुढे म्हणाले, “अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले गेले नाहीत. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. हे सरकार केवळ खोके गोळा करण्यासाठी आले आहे. जे खोके वाटले आहेत ते वसूल करण्यासाठी हे सरकार आलं आहे. हे जनतेच्या प्रश्नावर किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रश्नावर सरकार स्थापन झालं नाही. फक्त शिवसेना फोडायची, शिवसेना संपवायची, महाराष्ट्राचा स्वाभिमान नष्ट करायचा याच अजेंड्यावर हे सरकार आलं आहे.”

हेही वाचा : “एकनाथ शिंदेंचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यात भाजपाच्या प्रमुख लोकांचा हात”, तीन नेत्यांचा उल्लेख करत संजय राऊतांचा गंभीर आरोप

“…तर उद्धव ठाकरेंचं सरकार गेलंच नसतं”

“सरकार जनतेच्या प्रश्नावर चाललं असतं, तर उद्धव ठाकरेंचं सरकार गेलंच नसतं. ते जनतेच्या प्रश्नावर काम करणारं सरकार होतं,” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.