माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी त्यांना भाजपाकडून दोन वर्षांपूर्वीच ऑफर आल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच तेव्हाच महाविकासआघाडी सरकार कोसळलं असतं, असं म्हटलं. यानंतर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी देशमुखांकडे सर्व पुरावे असून त्यांनी हे पुरावे शरद पवारांनाही दाखवल्याचं नमूद केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “अनिल देशमुख सांगत आहेत ते खरं आहे. मला ते संपूर्ण प्रकरण माहिती आहे. अनिल देशमुखांवर कोणत्या प्रकारचा दबाव होता आणि त्यांना भाजपाने काय ऑफर दिली होती त्याचे पुरावे अनिल देशमुखांकडे आहेत. इतकंच नाही, तर त्याबाबतचे काही व्हिडीओही त्यांच्याकडे आहेत.”

“अनिल देशमुखांकडून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेऊ इच्छित होते”

“अनिल देशमुखांना कोण भेटलं, कोणी त्यांना ऑफर्स दिल्या, कोण त्यांच्याशी काय बोललं, कोण त्यांच्याकडून कोणत्या प्रतिज्ञापत्रावर सह्या घेऊ इच्छित होतं, कुणाची नावं घ्या असा दबाव होता ही सगळी माहिती माझ्याकडे होती. आजही ही माहिती आहे. अनिल देशमुखांशी माझं अनेकदा बोलणं झालं आहे. त्यासंदर्भातील सर्व पुरावे त्यांच्याकडे आहेत,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

“अनिल देशमुखांनी शरद पवारांनाही पुरावे दाखवले”

संजय राऊत पुढे म्हणाले, “काही पुरावे त्यावेळी त्यांनी शरद पवारांनाही दाखवले होते. मात्र, अनिल देशमुख यांनी तो प्रस्ताव नाकारल्यावर त्यांच्यावर खोटे आरोप करून तुरुंगात पाठवण्यात आलं.”

हेही वाचा : VIDEO: “सिल्व्हर ओकच्या काकांकडून संजय राऊतांना दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये…”, शिंदे गटाचा हल्लाबोल

“प्रत्येक विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर दबाव”

“प्रत्येक विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर काही आमदार घेऊन आमच्याकडे या असा दबाव आहे. नाही तर ‘गब्बर आ जाये गा, ईडी आ जाये गा’ असं म्हटलं जातं,” असंही राऊतांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut comment on anil deshmukh claim about bjp offer before ed action pbs