शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्न चिन्हं उपस्थित केली आहेत. एखाद्या विशिष्ट पक्षाच्या आणि विचारसणीच्या लोकांना न्यायालयाकडून रांगेत दिलासे कसे मिळतात असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्यांना मिळालेल्या दिलाश्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना राऊत यांनी भाजपाच्या लोकांना न्यायालयाकडून दिलासा कसा काय मिळतो, यासाठी न्यायव्यवस्थेमध्ये काही विशिष्ट लोक बसवली आहेत का?, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

नक्की वाचा >> सोमय्यांनी पत्नीच्या मदतीने १०० कोटींहून अधिकचा ‘टॉयलेट घोटाळा’ केल्याचा आरोप; संजय राऊत म्हणाले, “कागद पाहून…”

संजय राऊत यांना पत्रकारांनी सोमय्यांना दिलासा मिळाल्यानंतर तुम्ही, “दिलासा घोटाळा आहे” असं ट्विट केल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, “मी १०० टक्के सांगतो हा दिलासा घोटाळाच आहे. तो विशिष्ट राजकीय पक्षाच्या आणि विशिष्ट विचारांच्या लोकांनाच मिळावा यासाठी न्याययंत्रणेमध्ये एक व्यवस्था काम करतेय,” असं उत्तर दिलं.

पुढे बोलताना राऊत यांनी, “मी आताच महाराष्ट्रातले एक आमदार जे फडणवीसांचे उजवा हात म्हणून ओळखले जातात त्या संजय कुटे यांची एक जळगावची बातमी वाचत होतो. काल ते एका ठिकाणी असं बोलले की, ज्या गोष्टी आम्ही पोलीस आणि प्रशासनाकडून करुन घेऊ शकत नाही त्या आम्ही न्यायालयाकडून करुन घेत असतो. न्यायालयात आमचं वजन आहे. आता हे कोणत्या प्रकारचं वजन आहे हे काल परवा आपल्याला दिसलं असेल,” असा टोलाही लगावला.

नक्की वाचा >> “महाराष्ट्रात एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे न्यायपालिकांनी तरी…”; शिवसेनेचा संताप

“गेल्या काही काळापासून सतत काही लोकांना जे दिलासे मिळतायत भाजपाच्या लोकांना, अगदी दिशा सॅलिअन प्रकरणापासून मुंबै बँक प्रकरणापर्यंत
ते आयएनएस विक्रांतच्या निधीचा घोटाळ करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सगळ्यांना दिलासे कसे मिळतात?,” असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.

तसेच पुढे त्यांनी, “न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का? न्यायव्यवस्थेमध्ये विशेष अशी लोक बसवण्यात आलेली आहेत का? दिलासे देण्यासाठी
ते कोणाच्या सूचनेनुसार काम करतायत का?,” असेही प्रश्न उपस्थित केले. त्याप्रमाणे, “हे असच सुरु राहिलं तर या देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल,” असंही राऊत म्हणाले.