राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी “आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती”, असा खळबळजनक दावा केला. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यावर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच दीपक केसरकरांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली.ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “बापरे. खरं म्हणजे त्याबद्दल पोलिसांनी दीपक केसरकरांना ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार घोळतो आहे आणि ते केसरकरांना माहिती आहे.”

“…तेव्हा एकनाथ शिंदे आत्महत्या करू शकतात”

“उद्या विधानसभा अध्यक्षांनी घटनेला स्मरून काही निकाल दिला तर एकनाथ शिंदे आत्महत्या करू शकतात. त्यामुळे पोलिसांनी दीपक केसरकरांना ताबडतोब ताब्यात घेऊन कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी संजय राऊतांनी केली.

दीपक केसरकर काय म्हणाले होते?

दीपक केसरकर म्हणाले, “अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. एकनाथ शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला. नंतर एकनाथ शिंदेंना वाटलं, ही सर्व लोक माझ्याबरोबर प्रेमाने आली आहे. कारण, शिंदेंचा अपमान झाला, तो दिवस वर्धापनदिनाचा होता.”

“शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली”

“वर्धापनदिनादिवशीच एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली. एकनाथ शिंदे हे विधिमंडळाचे नेते होते. त्यांचा अपमान का केला? याचं उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे रागवून गेले असते, तर परत येण्याची तयारीही दाखवली होती,” असेही दीपक केसरकरांनी सांगितलं.

“…तेव्हा एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती”

“एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदेंनी म्हटलं, ‘मला जेव्हा वाटलं उठाव यशस्वी होणार की नाही, तेव्हा एकच गोष्ट केली असती. माझ्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता, माझी चूक झाली आहे. यांची काही चूक नाही. तिथेच माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती,’” असं शिंदेंनी सांगितल्याचं दीपक केसरकर म्हणाले.

हेही वाचा : “महाराष्ट्रात गद्दारी व्हावी यासाठी मोदींनीही प्रयत्न केले, त्यामुळे आता…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

“प्रसंगी जीव गेला तरी चालेल”

“माझ्यामुळे एकाही आमदाराचं राजकीय नुकसान होता कामा नये, प्रसंगी जीव गेला तरी चालेल. असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी राहणार नाहीत, तर कोणाच्या राहणार,” असेही दीपक केसरकरांनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut comment on deepak kesarkar claim about suicide thought of eknath shinde pbs
Show comments