शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्तेसाठी आपला वापर होतोय असं वाटल्यानंतर त्याच क्षणी लाथ मारून बाहेर पडणारी आम्ही स्वाभिमानी महाराष्ट्राची लोक आहोत, असं विधान केलं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही दाखल दिला. तसेच हिंदुत्वाचा अपमान होतोय हे लक्षात आल्यावर आम्ही बाहेर पडल्याचं सांगितलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “आम्ही कोणाला वापरू देत नाही. ज्या क्षणी आम्हाला वाटलं की आमचा वापर होतो, त्याच क्षणी लाथ मारून बाहेर पडणारी आम्ही स्वाभिमानी महाराष्ट्राची लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने स्वाभिमानासाठी औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर पडले, त्याच पद्धतीने शिवसेनेचा हिंदुत्वाचा अपमान होतोय हे लक्षात आल्यावर आम्ही बाहेर पडलो. आज शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे.”
“कोणाच्या वाढदिवसाला भैय्या नावाचा केक कापत होते हे आठवा”
“व्यापक चर्चा होऊ दे. त्यांनी हिंदुत्वाचा कातळ पांघरलेला आहे. ते १९९२ दंगल विसरले का? यामध्ये शिवसैनिकांनी बलिदान केले. अयोध्यामध्ये केलेला शिवसेनेचा त्याग ते विसरले का? मला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही. ते आमच्या रक्तामध्ये आहे. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये, तुम्ही अडचणीत याल. कोणाच्या वाढदिवसाला भैय्या नावाचा केक कापत होते हे जरा आठवा,” असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला.
“हनुमान भगवान नहीं, एक जंगली वानर, एक दलित…”
संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांची चिंता करण्याची गरज नाही. काही लोक या देशामध्ये दंगे घडवून विभाजन करण्याचा डाव करत आहेत. त्यांच्या विरोधात देखील शिवसेना लढत आहे. सन्मानीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान विरुद्ध केलेले उद्गार काय आहेत, हनुमान एक दलित व्यक्ती आहे. ‘हनुमान भगवान नहीं हैं, हनुमान एक जंगली वानर है’ असे वक्तव्य करणारे आम्हाला हनुमान चालीसाविषयी सांगतात.”
“अयोध्येला जाणाऱ्यांनी आपल्या नेत्यांचे योगींबद्दलचे वक्तव्यही समजून घ्या”
“ज्या अयोध्येमध्ये चालले आहेत त्या राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी आपल्या नेत्याचे वक्तव्य काय आहेत हे पण जरा समजून घ्या. ‘कोण हैं आदित्यनाथ, वो गंजा आदमी भगवे कपडे पहन के घुमता हैं पागल जैसा’ असं म्हणणारे अयोध्येला जात आहेत. आम्हाला बोलायला लावू नका. आता योगी त्यांचे कसे स्वागत करणार आम्ही पाहणार आहोत. योगी यांना गंजा, टकलू आदमी, भगवे कपडे खालून इकडे तिकडे फिरणारा असं बोलणाऱ्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
“अश्विनी कुमार चौबे यांनी पुन्हा एकदा योगी चालीसा वाचायला पाहिजे. मला हनुमान माहित आहे. महाराष्ट्र हा राम आणि हनुमानाचा पूजक आहे,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
“खेळी नसून जशास तसे उत्तर देणे शिवसेनेचा धर्म आणि…”
संजय राऊत म्हणाले, “खेळी नसून जशास तसे उत्तर देणे शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव आहे. जशास तसे उत्तर आम्ही नेहमीच देत असतो, हे आमचे बाळकडू आहे. शुक्रवारच्या (३० एप्रिल) बैठकीत ज्या सूचना दिल्या आहे त्याचं नक्कीच पालन होणार आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावाने नाव खराब करण्याचे काम काही जण करत आहेत. खास करून महाराष्ट्राची बदनामी काही असामाजिक संघटना करत आहेत. त्यांना उत्तर देत सामोरे जाऊ. शिवसेना छातीवर वार झेलणारा आणि समोरून वार करणारा पक्ष आहे. पाठीमागून वार आमच्यात चालत नाही.”
“आतापर्यंत आमचं सरकार असल्यानं संयम बाळगला, पण…”
“आतापर्यंत आम्ही आमच्याकडे सत्ता असल्यानं आणि आमचं सरकार असल्यानं संयम बाळगला, पण पाणी डोक्यावरून जात आहे. त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावे लागेल, मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील. आम्हाला लढण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज नाही. आम्हाला लढण्यासाठी भाडोत्री लोक देखील लागत नाही. आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढत नाही. आमची हत्यारे आमचीच आहे आणि ती धारदार आहेत. दोन घाव बसले की पाणी मागणार नाही,” असं म्हणत राऊतांनी इशारा दिला.
“महाराष्टामध्येच नाही, देशातही राजद्रोहाचे गुन्हे दाखल होतात”
संजय राऊत पुढे म्हणाले, “राजद्रोहा संदर्भात काही नियम अटी शर्ती असतात. जर कोणी राजद्रोहा सारखा गुन्हा केला असेल तर देशात अशाप्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत, महाराष्टामध्येच नाही. पंतप्रधानांबाबत ट्वीट केले, तर गुन्हा दाखल होतो, कोणी स्टँड अप कोमेडियनने सहज विनोद केला तर त्यावर देखील राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो.”
हेही वाचा : ‘योगी आणि भोगी’ वक्तव्यावरुन संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, “एखाद्याला पीएचडी करायची असेल तर…”
“बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुम्ही जी बेमानी केली त्याबाबत कदाचित बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील,” असं म्हणत त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधला.