शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झालाय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी किती आमदार आहेत याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच शिवसेनेने आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती केली. त्यामुळे शिवसेनेला नेमक्या किती आमदारांचा पाठिंबा आहे असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर संजय राऊत यांनी थेट उत्तर दिलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत केवळ १८ आमदार होते हे वृत्त चुकीचं आहे. सुधारणपणे ३०-३१ आमदार उपस्थित होते. त्यांची यादी तिकडे आहे. गटनेतेपदी अजय चौधरी यांची एकमताने नियुक्ती झाली आहे. काही आमदार आमच्याशी दुरध्वनीवरून संपर्कात होते. सुहास कांदे, प्रताप सरनाईक, लता सोनावणे इत्यादी संध्याकाळपर्यंत पोहचतील.”

“शिवसेनेचे ३१ आमदार मुंबईत होते”

“लता सोनावणे जात प्रमाणपत्राच्या एका खटल्याच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयात आहेत. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीचा खटला आहे त्यासाठी ते दिल्लीत न्यायालयात आहेत. सुहास कांदे यांना सकाळीच सीबीआयची नोटीस आली आणि ते सीबीआय कार्यालयात गेले. असे अनेक आमदार जिकडे तिकडे आहेत. त्यातील ३१ आमदार मुंबईत होते. त्यांची यादी आणि सह्या आहेत,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

“गुजरातमध्ये आमच्या आमदारांवर खुनी हल्ले”; राऊतांचा खळबळजनक आरोप

संजय राऊत म्हणाले, “बऱ्याच दिवसांपासून ऑपरेशन लोटस सुरू होतं. तसं नसतं तर आमच्या आमदारांचं अपहरण करून गुजरातला नेलं नसतं. त्यांना गुजरात पोलीस व केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आलंय. अनेक आमदारांनी तेथून सुटकेचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दहशत बसवण्यात आली. आमदारांवर खुनी हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. काही आमदारांनी आमच्या जीवाला धोका आहे, इथे आमचा खूनही होऊ शकतो, असं कळवलं आहे.”

गुजरातमध्ये जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही : संजय राऊत

“एकनाथ शिंदे यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील, तर त्यांना आम्ही मुंबईत येऊन चर्चा करण्यास सांगितलं आहे. गुजरातमध्ये जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही. त्या सर्वांना मुंबईला येण्यास सांगितलं आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा : Eknath Shinde Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केवळ १८ आमदार हजर होते का? संजय राऊत म्हणाले…; वाचा प्रत्येक अपडेट…

“…तर मुंबई पोलिसांना कठोर कारवाई करावी लागेल” ; संजय राऊत यांचा इशारा

“अनेक आमदारांच्या कुटुंबीयांना तक्रार केली आहे. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने त्यांचं अपहरण करून सुरतला नेल्याची आणि जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. आतापर्यंत ९ आमदारांच्या कुटुंबाने तक्रारी केल्या आहेत. हे असंच चालू राहिलं तर मुंबई पोलिसांना कठोर कारवाई करावी लागेल,” असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut comment on how many shivsena mlas are supporting uddhav thackeray pbs