आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी आपआपल्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेऊन रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. अशातच शिवसेना आमदारांचा काँग्रेसला मतदान करण्याला विरोध असल्याची चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. भाजपाकडून भ्रम निर्माण केला जात आहे, अफवा पसरवल्या जात आहे,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. ते रविवारी (१९ जून) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “अशाप्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याविषयी कधीही चर्चा झालेली नाही. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांचा संवाद उत्तम आहे. कोणी कसं मतदान करावं याविषयी देखील काही निर्णय झाले आहेत. भाजपाने याविषयी कितीही भ्रम निर्माण केले, अफवा पसरवल्या तरी त्याचं फळ त्यांना मिळणार नाही.”
“खून करणाऱ्या आणि शिक्षा सुनावलेल्या कैद्यालाही मतदानाचा अधिकार”
“अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आलाय. तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे. ३०२ कलमाखाली खून करणाऱ्या आणि त्यासाठी शिक्षा सुनावलेल्या कैद्याला देखील मतदानाचा अधिकार असतो,” असं मत संजय रऊत यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “शरद पवार हो म्हणाले असते तर ही निवडणूक…”; राष्ट्रपती निवडणुकीबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया
“कोणत्या न्यायाने आमदारांचा मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला?”
“घटनेने त्यांना अधिकार दिलेला आहे. तुम्ही घटनेची कलमं पाहा. मात्र, ज्यांना लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांची आमदारकी शाबूत असणाऱ्या दोन सदस्यांना कोणत्या न्यायाने हा अधिकार नाकारण्यात आला? कोणत्या कलमाने तुरुंगातील आमदारांचा मतदानाचा अधिकार नाकारला याविषयी संभ्रम आहे,” असंही राऊतांनी नमूद केलं.