राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. यानंतर या निर्णयाची राज्यासह देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते यावर नाखूश असून त्यांनी हा निर्णय मागे घेण्याचं शरद पवारांना आवाहन केलं आहे. दुसरीकडे महाविकासआघाडीच्या घटकपक्षांमध्येही चलबिचल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण दिलं. ते मंगळवारी (२ मे) मुंबईत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. शरद पवारांसारखे नेते राजकारण-समाजकारणातून कधीही निवृत्त होत नाहीत. पण हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्या निर्णयावर शिवसेनेने भाष्य करणं योग्य नाही. ते शरद पवार असल्यामुळे मी इतकंच सांगेन की, देशाला व महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनाची गरज आहे.”

“या घडामोडी सर्वांसाठी धक्कादायक, खळबळजनक असल्या तरी…”

“शरद पवारांनी इतके वर्षे राज्याला-देशाला नेतृत्व दिलं आणि ते यापुढेही देत राहतील असं मी त्यांचं विधान ऐकलं. एखाद्या पदावरून निवृत्त होणं म्हणजे राजकारणातून, समाजकारणातून दूर होणं असं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या बैठका सुरू आहेत. काही निर्णय घेतले जातील. या घडामोडी अचानक घडून आल्या असल्या, या घडामोडी सर्वांसाठी धक्कादायक, खळबळजनक असल्या तरी अलिकडच्या काही घटनांवरून त्यात अनपेक्षित असं काही नाही,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

“निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला याचं विश्लेषण तेच करू शकतात”

संजय राऊत पुढे म्हणाले, “शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला, का घेतला याचं विश्लेषण तेच करू शकतात. त्यांच्या या निर्णयाने पक्षाचे अनेक कार्यकर्ते, नेते अस्वस्थ झाले हे मी पाहिलं.”

“बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता”

“१९८९ च्या दरम्यान हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. पक्षातील, राजकारणातील, महाराष्ट्रातील काही घडामोडींचा त्यांना उबग आला होता. त्यातून त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र, लोकमत आणि शिवसैनिकांचा रेटा इतका अफाट होता की, जनतेने त्यांना काही दिवसांनी तो राजीनामा परत घेऊन शिवसेनाप्रमुख पदावरून विराजमान केलं. मी याचा साक्षीदार आहे,” असं राऊतांनी सांगितलं.

हेही वाचा : शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण, हे बदलाचे संकेत? अजित पवार म्हणाले…

“असे नेते अनेकदा विशिष्ट परिस्थितीत निर्णय घेतात. शरद पवारांनी असा निर्णय घेतला असेल, तर तो त्यांचा निर्णय आहे,” असंही राऊतांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut comment on sharad pawar decision about ncp president pbs