शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बाळासाहेबांच्या योगदानावर भाष्य केलं. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत येऊ शकल्या असत्या, पण बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हे सगळं थांबलं, असं मत व्यक्त केलं. तसेच बाळासाहेब नसते तर विभूषण यांचं ‘काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, अगर शिवाजी न होता, तो सबकी सुन्नत होती’ हे वाक्य देशात वेगळ्या प्रकारे लिहावं लागलं असतं, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी, देशासाठी काय केलं असा प्रश्न कोणाच्याही मनात येणार नाही. बाळासाहेबांनी काय केलं हे एका वाक्यात सांगायचं, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढे नेलं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नेहमी म्हटलं जातं की ‘काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, अगर शिवाजी न होता, तो सबकी सुन्नत होती’. बाळासाहेब देखील नसते, शिवसेना काढली नसती, तर विभूषण यांचं हेच वाक्य महाराष्ट्रात आणि देशात वेगळ्या प्रकारे लिहावं लागलं असतं.”
“पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या”
“पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या, येऊ शकल्या असत्या, पण बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हे सगळं थांबलं. महाराष्ट्र महाराष्ट्र राहिला, हिंदुस्थान हिंदुस्थान राहिला. त्यामुळे शिवसेनेचं महत्त्व या देशाच्या राजकारणात आजही आहे. हे महत्त्व बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूह्रदयसम्राट म्हणून जो महान विचार पेरला, रुजवला आमि वाढवला यामुळे आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
हेही वाचा : बाळासाहेब असते तर महाराष्ट्रातील भाजपाच्या बेताल माकडचेष्टा पाहून…; संजय राऊतांचं रोखठोक
“देशात शेतकऱ्यांची भीती वाटावी असं वातावरण कोणी निर्माण केलं?”
“बाळासाहेबांच्या काळात पंतप्रधानांना ४ शेतकऱ्यांनी गाडी अडवली म्हणून परत यावं लागलं नसतं. आज या देशाच्या पंतप्रधानांना शेतकऱ्यांची भीती वाटते म्हणून ते पंजाबमधून परत येतात. देशात शेतकऱ्यांची भीती वाटावी असं वातावरण कोणी निर्माण केलं?” असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.