शिवसेनेच्या (ठाकरे गट) विधान परिषदेतील आमदार मनिषा कायंदे तीन नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी कोण हे आमदार असं विचारलं. तसेच अशा लोकांचा कचरा इकडे तिकडे उडत असतो, अशी टीका केली. ते रविवारी (१८ जून) वरळीत आयोजित राज्यव्यापी शिबिरात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “कोण आमदार, त्याचं नाव माहिती आहे का? अशा लोकांचा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की हा कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो. त्याकडे दुर्लक्ष करा. ते फार महान लोक नाहीत.”

“दुसरा मेळावा हा गद्दार दिनाचा”

शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच दोन मेळावे होत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांकडून आपलाच मेळावा खरा असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत हे वक्तव्य चुकीचं आहे. याबाबत आदित्य ठाकरेंनी खूप चांगलं वक्तव्य केलं आहे. दुसरा मेळावा हा गद्दार दिनाचा मेळावा आहे. त्यांचा मेळावा शिवसेना दिनाचा नाही.”

“वाघाचे कातडे पांघरलेले लांडगे निघाले गोरेगावला”

“ते ‘वाघ निघाले गोरेगावला’ असे बॅनर लावत आहेत. मात्र, त्यांची मराठी चुकते आहे. त्यांची शाळा घेतली पाहिजे. मी त्यांना शिकवतो. ‘वाघाचे कातडे पांघरलेले लांडगे निघाले गोरेगावला’ असं बॅनरवर लिहिलं पाहिजे. सगळे वाघ तर शिवसेनेच्या या शिबिरात आहेत,” असं म्हणज संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

“उद्धव ठाकरे तहहयात आमचे पक्षप्रमुख”

“उद्धव ठाकरे तहहयात आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यांना पक्षप्रमुख करण्याच्या ठरावाची गरज नाही. ते ठराव इथं होत नाहीत. या तांत्रिक गोष्टी पूर्ण होत असतात,” असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

हेही वाचा : VIDEO: भाजपात प्रवेश केल्यानंतर आशिष देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “२०१९ मध्ये मी फडणवीसांविरोधात…”

“बावनकुळे या माणसाला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही”

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरेवर फुलं वाहिली. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर द्यावं अशी मागणी केली. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे या माणसाला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. बावनकुळेंना महाराष्ट्र समजत नाही, विषय समजत नाही. हा प्रश्न त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि कबरीवर जाऊन औरंगजेबाला विचारावा. त्यांच्याच राज्यात ती औरंगजेबाची कबर आहे.”