मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक आहेत. त्यांना मराठा समाजातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अशातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाला विरोध केलाय. तसेच जरांगेंच्या भव्य सभांवरून प्रश्न उपस्थित केले. त्यावरून आता शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भुजबळांवर टीका केली. ते रविवारी (१५ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ राजकारण करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांनी आपली जुनी वक्तव्यं आधी तपासून घ्यावी. फडणवीस म्हणत होते कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ. मी मुख्यमंत्री होईल आणि लगेच मराठा समाजाला आरक्षण देईल, असं एकनाथ शिंदे म्हणत होते.”

“भुजबळांची वक्तव्ये समाजामध्ये फूट पाडणारी, आग लावणारी”

“मराठा समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावरती उतरला आहे. आपण सर्व मराठा समाजाच्या मूक मोर्चामध्ये छाती पुढे काढून चालत होते. मग आता आपल्या हातात सत्ता आहे. तुम्ही वातावरण चिघळवण्याचं काम करत आहात. भुजबळ यांची वक्तव्य महाराष्ट्राच्या समाजामध्ये फूट पाडणारी, आग लावणारी आहे,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “अध्यक्षांना आता आयसीयूत जाण्याची वेळ आली”; संजय राऊतांच्या टीकेवर राहुल नार्वेकर म्हणाले…

“राज्याच्या एकतेला आग लावता येणार नाही”

“हा विषय अत्यंत संयमाने हाताळला पाहिजे. राज्याच्या एकतेला आग लावता येणार नाही. सदाभाऊ खोत म्हणजे कर्मवीर नाहीत. ते काय बोलतात त्यांच्याशी मला पडलेले नाही. मी महाराष्ट्रसाठी बोलतो,” असं म्हणत संजय राऊतांनी सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर बोलणं टाळलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticize chhagan bhujbal over maratha reservation manoj jarange pbs
Show comments