मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी अटक केली. यावर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी दळवींच्या ज्या शब्दावरून गुन्हा दाखल झाला, तो शब्द धर्मवीर चित्रपटात आनंद दिघेंच्या तोंडी असल्याचाही मुद्दा उपस्थित केला. तसेच एकनाथ शिंदेंवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
संजय राऊत पुढे म्हणाले, “खरंम्हणजे गद्दार हृदयसम्राटांनी स्वतःला हिंदू हृदयसम्राट म्हणून घेणं वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. त्यासाठी खरं म्हणजे एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही. मी एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करत आहे.”
“त्यात ते काय चुकीचं बोलले आहेत?”
“एकनाथ शिंदे वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची हिंदू हृदयसम्राट ही पदवी स्वतःला लावून घेत आहेत. यावर दत्ता दळवींनी शिवसैनिक म्हणून त्या सभेत जोशपूर्ण भाषण केलं. ते असे म्हणाले की, आनंद दिघे असते, तर या गद्दार हृदयसम्राटांना चाबकाने फोडून काढलं असतं. त्यात ते काय चुकीचं बोलले आहेत?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.
हेही वाचा : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकनाथ शिंदेंवर…”
“माध्यमं त्या शब्दाच्या ऐवजी तीन फुल्या करतील, मात्र तो शब्द…”
“दत्ता दळवींनी एक शब्द वापरला आणि तो शब्द असा आहे की, माध्यमं त्या शब्दाच्या ऐवजी तीन फुल्या करतील. मात्र, तो शब्द धर्मवीर चित्रपटात आनंद दिघेंच्या तोंडी घातलेला आहे. तो शब्द जशाचा तसा आहे आणि सेंसॉर बोर्डाने तो शब्द कापलेला नाही. जर तो शब्द चुकीचा असेल, तर धर्मवीर चित्रपटाचे निर्माते, चित्रपटाचे प्रायोजक आणि कलाकार यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल केला का?” असा प्रश्न राऊतांनी विचारत सरकारला घेरलं.