शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. “मोदी भाजपाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी आतापर्यंत महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर कारवाई करायला हवी होती. मात्र, आज अपमान करणारे व्यासपीठावर आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते रविवारी (११ डिसेंबर) मुंबईत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा यावर परखड भाष्य केलं आहे.

“मोदींनी कोश्यारींवर कारवाई केली नाही”

“नागपूरत मोदींच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहेत. त्यांच्यावर मोदी सरकारने कारवाई केली नाही. ते व्यासपीठावर असताना मोदी शिवरायांचं कौतुक करणार आहेत हे आम्हाला माहिती आहे. जनता हे पाहतेय,” असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला.

व्हिडीओ पाहा :

“आतापर्यंत कोश्यारींना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवलं पाहिजे होतं”

संजय राऊत म्हणाले, “मोदी भाजपाचे सर्वेसर्वा आहेत, आतापर्यंत कोश्यारींना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवलं पाहिजे होतं. ते महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि सन्मानाशी खेळ करत आहेत. ते आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.”

हेही वाचा : VIDEO: संजय राऊतांवर हल्ला करण्याची धमकी, शिंदे गटाचे आमदार म्हणाले, “त्या खेकड्याला…”

“एव्हाना मोदींनी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायलाच हवी होती”

“नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, अमित शाह गृहमंत्री आहेत. त्यांनी एव्हाना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायलाच हवी होती. उलट तेच आज मोदींबरोबर व्यासपीठावर आहेत. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी पाहतोय,” असंही राऊतांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticize narendra modi over governor bhagat singh koshyari controversy rno news pbs