संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांचं लक्ष आज (१९ नोव्हेंबर) क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही मजबूत संघ मैदानात भिडणार आहेत. या पार्श्वभूमीवर या सामन्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी खेळाचा राजकीय इव्हेंट करण्याचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपावर सडकून टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “आज क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना आहे. मी कधी क्रिकेट सामने पाहत नाही, पण भाजपाचे लोक संध्याकाळी सांगतील की, मोदी होते म्हणून जिंकलो. मोदी होते म्हणून अशी गोलंदाजी झाली, मोदी होते म्हणून असे चेंडू वळले, गुगली पडली. मोदींनीच मंत्र दिला. अमित शाह स्टंपच्या मागे उभे राहून मार्गदर्शन करत होते. हे लोक खेळाचाही राजकीय इव्हेंट करण्यापासून सोडत नाहीत.”

“मुंबईतून संपूर्ण क्रिकेट अहमदाबादला हलवलं”

“मुंबई क्रिकेटची पंढरी होती. मात्र, मुंबईतून संपूर्ण क्रिकेट अहमदाबादला हलवण्यात आलं. सध्या मॅच फिक्सिंग आहे म्हणून, नाहीतर त्यांचा आत्ताच धुव्वा उडाला आहे. बेटिंग आणि मॅच फिक्सिंगनेच देश चालू आहे,” असे आरोप करत संजय राऊतांनी भाजपावर सडकून टीका केली.

व्हिडीओ पाहा :

https://x.com/ANI/status/1726106712254640361

“प्रत्येक गोष्टीत राजकीय इव्हेंट केला जात आहे”

संजय राऊत पुढे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा राजकीय इव्हेंट केला जात आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून कुणाचा मृत्यू असो अथवा खेळ, प्रत्येक गोष्टीत राजकीय इव्हेंट होत आहे. इथं मरणाचाही इव्हेंट केला जातो. खोटे अश्रु काढले जातात. आता हा तर क्रिकेट विश्वचषक आहे. इथं राजकारण कशासाठी, मात्र अहमदाबादमध्ये त्या खेळाचाही राजकीय इव्हेंट सुरू आहे.”

हेही वाचा : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर कोट्यवधींची सट्टेबाजी; पोलिसांची सट्टेबाजांवर करडी नजर

“मोदी ‘बॉलिंग’ करतील, शाह ‘बॅटिंग’ करतील आणि…”

“असं चित्र उभं केलं जात आहे की, जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बॉलिंग’ करतील, अमित शाह ‘बॅटिंग’ करतील, भाजपाचे लोक मैदानाच्या सीमेवर उभे राहतील. त्यानंतर म्हणतील आम्ही सांगितलं होतं की, अशी गोलंदाजी करा, हा फटका मारा. मोदी होते म्हणूनच आपला संघ जिंकला असंही म्हटलं जाईल. या देशात आजकाल काहीही होतं,” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticize pm narendra modi bjp for cwc 23 event pbs
Show comments