पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. याला शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “मोदींना विसरण्याचा आजार झाला आहे का?”, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. तसेच पंतप्रधान पदावर असताना मोदींना असं बोलणं शोभत नाही, असंही म्हटलं. ते शनिवारी (२८ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपर्यंत म्हणत होते की, शरद पवार त्यांचे गुरू आहेत. ते त्यांचं बोट पकडून राजकारणात आले आहेत. ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा कृषीमंत्री शरद पवारांनी त्यांना खूप मदत केली. हे सर्व मोदींचेच वक्तव्ये आहेत. मोदींना विसरण्याचा आजार झाला आहे का?”

“मोदींना विसरण्याचा आजार असेल, तर त्यांनी…”

“मोदींना विसरण्याचा आजार असेल, तर त्यांनी उपचार करून घ्यावेत. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. असं बोलणं त्यांना शोभत नाही. मोदी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील नेत्यांची बदनामी करतात. जे राजकीय पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात त्या पक्षांच्या नेत्यांवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर मोदी चिखलफेक करत आहेत. हे योग्य नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“अजित पवारांनी मंचावरून उठून निघून जायला हवं होतं”

“मोदींनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना गुलाम बनवलं आहे. त्यांच्यापेक्षा गुलाम बरे आहेत. मोदींनी शरद पवारांवर ती टीका केल्यानंतर अजित पवारांनी मंचावरून उठून निघून जायला हवं होतं. मोदींनी आज शरद पवारांवर ही टीका केली, उद्या ते बाळासाहेब ठाकरेंविषयीही असंच बोलू शकतात,” असंही राऊतांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticize pm narendra modi mention ajit pawar pbs