शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. “पंतप्रधान मोदींना रशिया-युक्रेन युद्धाची चिंता आहे. त्यासाठी ते मध्यस्थी करतात आणि भक्त त्यांची वाहवाह करतात. मात्र, या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच भोंग्यांवर बोलणं तुमचं काम नाही, असं म्हणत मोदी सरकारला टोला लगावला.
संजय राऊत म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची चिंता आहे. त्यासाठी ते मध्यस्थी करत आहेत. त्यासाठी त्यांचे भक्त त्यांची वाहवाह करत आहेत. मात्र, या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलेंडर दर, बेरोजगारी या संदर्भात भाजपाचा एकही नेता, मंत्री बोलत नाही.”
“भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला”
“भोंग्यावर कसले बोलताय, महागाई, बेरोजगारीवर बोला. सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, महागाई यावर बोलणं सरकारचं कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही,” असं म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
“हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न, पण…”
संजय राऊत म्हणाले, “पोलिसांच्या भीतीने सर्व राजकीय भोंगे गायब झाले. इथं कायद्याचं राज्य आहे. या राज्यात सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्यानुसार काम होईल. महाराष्ट्रात शांतता आहे. कोणत्याही समाजात कुठंही भांडण नाही, सर्व ठीक आहे. काही लोक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते. भोंग्यावरून हिंदू मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करण्याचा, दंगे करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनी त्यांना खणखणीत उत्तर दिलं. ना हे महाराष्ट्रात चालेल, ना देशात.”
“भोंग्यावरील भूमिकेचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला”
“भोंग्यांबाबत देशात नक्कीच एक धोरण असायला हवं असं आम्ही आधीही म्हटलं आहे. मला वाटतं आता सरकारला हे धोरण करावं लागेल. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील याबाबत राष्ट्रीय धोरण जाहीर करण्याची मागणी केलीय. याप्रमाणे देशासाठी धोरण करून देशाला लागू करा. यात जात-धर्माचा प्रश्न येत नाही. मात्र, ज्यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
हेही वाचा : “जोधपूरमध्ये दंगल सुरू असताना देशाचे पंतप्रधानही…”; राहुल गांधींवरील टीकेनंतर भाजपाला शिवसेनेचे प्रत्युत्तर
“हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न”
संजय राऊत पुढे म्हणाले, “भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला. त्यामुळे महाराष्ट्रात या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदू समाज आहे. त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. खरंतर यांना हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली निर्माण करायच्या आहेत. सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही. या राज्याची जनता सुजाण आहे.”