अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर आज सकाळी छापे टाकले. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आले. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजपावर टीकास्र सोडले. जो व्यक्ती सत्ताधाऱ्यांविरोधात बोलतो, त्यांच्यावर तपास यंत्रणांचे छापे पडतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
काय म्हणाले संजय राऊत?
“जो व्यक्ती सत्ताधाऱ्यांविरोधात बोलतो, त्यांच्यावर तपास यंत्रणांचे छापे पडतात. गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांविरोधात अशी कारवाई झाली आहे. यात माझाही समावेश आहे. हसन मुश्रीफ यांना तुरुंगात टाकण्याची भाषा भाजपाच्या काही लोकांनी केली होती. खरं म्हणजे अशी भाषा भावना गवळी, यशवंत जाधव यांच्याविरोधातही झाली होती. ते सत्तेत गेल्यानंतर त्यांना दिलासा मिळतो. पण जे विरोधी पक्षात आहेत, त्यांच्या विरोधात अशा प्रकारे दबावाचे राजकारण केलं जातं”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. हसन मुश्रीफ हे लढवय्ये नेते आहेत. संघर्ष करणारे नेते आहेत. ते या सर्व संकटातून बाहेर पडतील आम्ही सर्व त्यांच्या पाठिशी आहोत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – Hasan Mushrif ED Raid : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी
महाजनांच्या विधानावरून भाजपावर टीकास्र
पुढे त्यांनी गिरीष महाजन यांच्या विधानावरून भाजपा-शिंदे गटाला लक्ष्य केलं. “भाजपाचे नेते आणि देवेंद्र फडणवीसांचा उजवा हात असेलेले गिरीष महाजन यांनी जळगावात मुख्यमंत्र्यांसमोर एक विधान केलं. त्यावरून सामानातून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. शिवसेना फोडणं हे आमचं मिशन होतं, ते आम्ही पूर्ण केलं, त्याचा आम्हाला आनंद आहे, असं महाजन म्हणाले होते. त्यावेळी मुख्यमंत्रीही तिथे होते, हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आम्ही पक्षातून बाहेर पडलो, ते महाविकास आघाडीमुळे आणि शरद पवारांमुळे हा दावा जो शिंदे गट करत होता, त्यावर पडदा टाकण्याचे काम गिरीष महाजन यांनी केले आहे. शिवसेना ही भाजपालाच फोटायची होती, हे स्पष्ट आहे”, अशी टीका त्यांनी केली.
मोहन भागवतांच्या विधानावरही दिली प्रतिक्रिया
“देशातील मुस्लीमांना घाबरू नये”, असं विधान काल सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. याबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “मोहन भागवत यांच्या विधानाशी आम्ही सहमत आहोत. या देशात २० कोटींपेक्षा जास्त मुस्लीम बांधव राहतात. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी सातत्याने हिंदू-मुस्लीम करत बसलो, तर हा देश पुन्हा विभाजनाच्या दिशेने जाईल. लोकांच्या मनात भीती निर्माण करून तुम्ही जास्त वेळ राजकारण करू शकत नाही. ही बाब आमचे मार्गदर्शन मोहन भागवत यांनी निदर्शनात आणून दिली असेल, याबाबत भाजपाने गांभीर्याने विचार केला पाहिजे ”, असे ते म्हणाले.
दरम्यान, त्यांनी काल राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळले. “या भेटीबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही”, असे ते म्हणाले.